आजकाल प्रत्येक पदार्थांमधली भेसळ वाढली आहे. त्यामुळे आपण शुद्ध म्हणून खातो, ते कोणते पदार्थ खरंच शुद्ध आणि कोणते भेसळीचे हे त्यांच्याकडे बघून लगेच लक्षातही येत नाही. त्यातही आता सणासुदीचे दिवस आले की ज्या अन्नपदार्थांची मागणी वाढलेली असते, त्या पदार्थांमधली भेसळ वाढते. त्यामुळे सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या भेसळीबाबत (food adulteration) आता सतर्क राहण्याची गरज आहे. पावसाळा, श्रावण या काळात आपोआपच बेसनपीठाची गरज वाढलेली असते. त्यामुळेच या काळात बेसनात भेसळ हाेण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच घरी आणलेले बेसन शुद्ध की भेसळीचे हे ओळखण्यासाठी या काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा..(Tips to identify the adulteration in besan)
बेसन पीठातली भेसळ ओळखण्याचे उपाय
१. हायड्रोक्लोरिक ॲसिड
एचसीएल म्हणजेच हायड्रोक्लोरिक ॲसिडचा उपयोग करून हरबरा डाळीच्या पिठात म्हणजे बेसनात भेसळ आहे की नाही, हे ओळखता येते. हा उपाय करून बघण्यासाठी एका वाटीमध्ये २ ते ३ चमचे बेसन घ्या आणि त्यात पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करा. या पिठात आता २ चमचे हायड्रोक्लोरिक ॲसिड टाका. जो चमचा बेसन पीठासाठी वापरला आहे, त्याच चमच्याच्या मापाने हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्या. काही मिनिटे वाट बघा. बेसन पीठाचा रंग लालसर झाला तर ते भेसळीचं आहे, हे लक्षात घ्या.
२. लिंबू
लिंबू हे घरात अगदी सहज उपलब्ध असते. त्यामुळे लिंबाचा रस वापरून बेसन पिठातली भेसळ कशी ओळखायची, ते जाणून घेऊया. यासाठी एका भांड्यात ३ चमचे बेसन पीठ घ्या. त्यात त्या पिठाएवढाच म्हणजेच ३ चमचेच लिंबाचा रस टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. त्यात काही थेंब हायड्रोक्लोरिक ॲसिड टाका आणि सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. ५ मिनिटे हे मिश्रण तसेच ठेवा. जर बेसन पिठाचा रंग उडाल्यासारखा वाटला किंवा लालसर झाला तर ते शुद्ध नाही, असे समजावे.