दिवाळी जवळ आली, सगळ्यांच्याच घरात फराळाची लगबग एव्हाना सुरू झाली असेल. याशिवाय बाजारातूनही आपण अनेक प्रकारच्या मिठाया विकत आणतो. मात्र मिठाईत भेसळ तर नाही हे कसं ओळखायचं? त्यासाठी मिठाई खरेदी करताना काही गोष्टींची खात्री अवश्य करुन घ्यायला हवी. नाहीतर आपल्या आरोग्यासाठी ही मिठाई घातक ठरु शकते. एकतर माहितगार दुकानातून मिठाई घ्या आणि त्यासोबतच हाताशी असू द्या, ही चेकलिस्ट (How To Identify Adulteration In Mithai Sweets In Diwali Festivals)..
१. खाण्याचा रंग की भेसळ?
जास्त रंग असलेल्या मिठाई खरेदी करणे शक्यतो टाळावे. मिठाई खरेदी करताना मिठाई आधी हातावर घेऊन पाहावे. जर मिठाईचा रंग हाताला लागला, तर शक्यतो ती मिठाई घेऊ नये. मिठाईवर रंग येण्यासाठी मेटानिल येलो आणि टारट्राजाइनचा वापर अधिक केला जातो. हे रंग आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतात. या रंगामुळे किडनी खराब होण्याचा अधिक धोका असतो. तेव्हा शक्यतो रंगबिरंगी मिठाई घेणे टाळलेलेच बरे.
२. खव्यात भेसळ?
मिठाईतील बरेचसे प्रकार साधारणपणे खव्यापासून तयार झालेले असतात. दिवाळीच्या काळात बाजारात मागणी जास्त असल्याने खवा किंवा मेवा यातली भेसळ शोधण्यासाठी घरच्या घरी करता येईल असा एक सोपा उपाय आहे. या पदार्थावर आयोडीनचे दोन थेंब टाकावे. जर हा रंग काळा पडला तर, मेवा भेसळयुक्त आहे असे समजावे.
३. मिठाई ताजी की शिळी?
मिठाई विकली गेली नाही तर ती दुकानात काही दिवसांसाठी तशीच पडून राहीलेली असू शकते. अशावेळी एकतर वास घ्या. आंबूस वास येत असेल तर मिठाई घेऊ नका. मिठाईवर बुरशी तर नाही ना खात्री करा. मिठाईचा तुकडा जमलं तर तोडून पाहा, म्हणजे शिळ्या मिठाईचा कोरडेपणा कळण्यास मदत होईल.