Join us  

Adulteration in Red Chili Powder: वर्षभरासाठी तिखट घेतलं, पण ते शुद्ध आहे की भेसळ हे कसं ओळखणार? ४ टिप्स, भेसळ ओळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2022 12:49 PM

Adulteration in Red Chili Powder: या दिवसांमध्ये सहसा घरोघरी एकतर लाल तिखट घरी तयार केलं जातं किंवा मग विकत घेतलं जातं. विकत घेणार असाल तर ते तिखट शुद्ध आहे की भेसळीचं (difference between pure and fake chili powder) हे व्यवस्थित पारखून घेणं गरजेचं आहे..

ठळक मुद्देतिखटाच्या अनेक पाकीटांवर तर कुठलंही मार्किंग, बारकोड असं काहीच नसतं. मग आपण घेतोय ते तिखट शुद्ध आहे की भेसळीचं हे कसं ओळखायचं?

लाल तिखट हा घरोघरी लागणारा पदार्थ. भले ही कमी प्रमाणात लागो किंवा मग जास्त प्रमाणात.. पण लागतं मात्र सगळ्यांनाच. साधारणपणे उन्हाळा संपत आला आणि पावसाळ्याची चाहूल लागली की घरोघरी लाल तिखट, मसाला तयार करण्याची लगबग सुरू होते. अर्थात आता पुरेसा वेळ नसल्याने अनेक जण लाल तिखट (red chili) विकतच आणतात. साधारणपणे वर्षभराचं तिखट एकदाच घेऊन ठेवलं जातं. तिखटाच्या अनेक पाकीटांवर तर कुठलंही मार्किंग, बारकोड असं काहीच नसतं. मग आपण घेतोय ते तिखट शुद्ध आहे की भेसळीचं हे कसं ओळखायचं? त्यासाठीच तर बघा या काही खास टिप्स (4 tips to identify fake chili powder)

 

आजकाल कोणत्याही पदार्थामध्ये अगदी सहजपणे भेसळ केली जाते. दूध असो, पनीर असो किंवा मग अगदी भगर, साबुदाणा किंवा तेल.. त्या भेसळीमध्यही इतका सफाईदारपणा असतो की कित्येक दिवस आपण तो पदार्थ खात असतो, तरीही आपल्याला त्यातील भेसळीचा पत्ताही लागत नाही. म्हणूनच तर आता या काही सोप्या ट्रिक्स वापरून बघा आणि तुम्ही खात असलेलं तिखट भेसळीचं की शुद्ध हे एकदा तपासून पहा.

 

कशी ओळखायची तिखटातली भेसळ?१. तिखटामध्ये अनेकदा विटांचा भुसा किंवा विटांची पावडर टाकली जाते. हा प्रकार ओळखण्यासाठी एका ग्लासमध्ये पाणी घ्या. त्यात १ चमचा तिखट टाका. तिखट जर पाण्यावर तरंगलं तर ते शुद्ध आहे, असं समजा. विटांचा भुसा जड असल्याने तो लगेच खाली जातो.२. तिखटामध्ये लाल रंग टाकण्याचे प्रमाणही दिसून येते. रोडामिन हा घटक मिसळून तिखटाला लाल रंग दिला जातो. हे तपासण्यासाठी एका वाटीत थोडंसं लाल तिखट घ्या. त्यावर ५ मिली. नेलपेंट रिमुव्हर टाका. नेलपेंट रिमुव्हर टाकल्यानंतर जर पुढच्या काही सेकंदात तिखटाचा रंग उडालेला दिसला तर ते तिखट भेसळीचं आहे, हे ओळखा.

३. काही वेळा तिखटामध्ये स्टार्चदेखील टाकण्यात येते. हे ओळखण्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट घ्या. त्यात आयोडिनचे काही थेंब टाका. तिखटाचा रंग बदलून निळसर दिसू लागला तर त्यात स्टार्च आहे, हे ओळखावे. ४. तिखटामध्ये विटांचा चुरा आहे की नाही हे तपासण्यासाठी आणखी एक चाचणी घरच्याघरी करता येते. यासाठी ओटा आधी स्वच्छ करा. मग त्यावर १ टेबलस्पून तिखट टाका. लाटणं घेऊन त्या तिखटावर पोळी केल्याप्रमाणे फिरवा. जर लाटणं फिरवताना करकर आवाज आला तर ते तिखट भेसळीचं आहे. 

 

टॅग्स :अन्नसमर स्पेशलआरोग्य