रोजच्या रोज भात खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते किंवा लठ्ठपणा वाढतो असा अनेकांचा समज असतो. त्यामुळे भात खूप आवडत असूनही तो खाणे टाळले जाते. भात हलका असतो त्यामुळे खरंतर लहान पणापासून आपण भातच जास्त खाल्लेला असतो. तसेच वेगवेगळ्या प्रकारचा गरमागरम भात म्हणजे अनेकांचा जेवणातला आवडीचा पदार्थ. मात्र शुगर वाढेल किंवा शरीरावरची चरबी वाढेल म्हणून भात खाण्यावर मनाविरुद्ध नियंत्रण ठेवले जाते. मात्र आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल, भातात फोलिक अॅसिड, बी व्हिटॅमिन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सेलेनियम, फायबर, लोह यांसारखे एकूण १५ हून अधिक उपयुक्त घटक असतात. तांदळामध्येही लाल तांदूळ, हातसडीचा तांदूळ, चिकट तांदूळ, मोठ्या आकाराचा तांदूळ किंवा अगदी काळा तांदूळ असे बरेच प्रकार असतात. आता नेमक्या कोणत्या तांदळात काय गुणधर्म असतात पाहूया (How to Identify Best Rice to Eat)...
१. पांढरा भात
आपण सगळेच साधारणपणे पांढरा भात खातो. घरात किंवा बाहेरही हा पांढरा तांदूळच प्रामुख्याने वापरला जातो. युनाइटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चर नॅशनलनुसार या तांदळात लोह, व्हिटॅमि बी १, व्हिटॅमिन बी ३ आणि फोलिक अॅसिड असते. त्यामुळे पाव कप पांढऱ्या तांदळात १६० कॅलरीज असतात.
२. ब्राऊन राईस
हल्ली ब्राऊन राईस खायचेही बरेच फॅड आले आहे. पण पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईसच्या पाव कपात केवळ १.५ ग्रॅम फायबर जास्त असतात. पचनासाठी हा भात तुलनेने हलका असल्याने अनेकदा तो खाण्याचा सल्ला दिला जातो.
३. ब्लॅक राईस
काळ्या रंगाचा दिसणारा हा तांदूळ शिजवल्यावर गडद जांभळ्या रंगाचा दिसतो. ब्राऊन राईसच्या तुलनेत ब्लॅक राईसमध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. पाव कप तांदळातून ५ ग्रॅम प्रोटीन आणि ३ ग्रॅम फायबर मिळते. काळ्या तांदळाचा भात करण्यापेक्षा त्याचे सलाड, दलिया असे प्रकार जास्त चांगले लागतात. आपल्याकडे हा भात फारच कमी दिसून येतो.
४. लाल तांदूळ
याशिवाय बऱ्याच ठिकाणी लाल रंगाचा तांदूळही आवर्जून खाल्ला जातो. त्याची चव थोडीशी खारट आणि आक्रोडासारखी असते. त्यामध्ये आरोग्यासाठी आवश्यक घटक असतातच पण या तांदळामुळे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासही हा तांदूळ उपयुक्त असतो.