दिवाळीची (Diwali 2024) कितीही तयारी करा, फराळाशिवाय ती अपूर्णच आहे. दिवाळीनिमित्त प्रत्येक घरात हमखास फराळ तयार होतो. दिवाळी म्हटलं की कंदील, रोषणाई, फटाके आणि येतो तो दिवाळी फराळ. दिवाळी येणार म्हटलं की आठवडाभर आधीपासूनच सुरू होतो तो घराघरातून येणारा दिवाळीच्या फराळाचा सुगंध. दिवाळी फराळाचे पदार्थ (Diwali Faral) आपल्याकडे इतके असतात आणि प्रत्येक घरात त्यातील जमतील तेवढे पदार्थ तयार केले जातात. कितीही वेळ नसला तरीही वेळात वेळा काढून किमान चकली, चिवडा, लाडू शंकरपाळे हे पदार्थ घरात केले जातातच. दिवाळी फराळाचे पदार्थ म्हणजे तोंडाला पाणीच सुटते(How to store diwali faral properly).
घरातील स्त्रिया रोजच्या कामांतून थोडासा वेळ काढून अगदी हौसेने फराळातील पदार्थ तयार करते. बदलत्या काळानुसार फराळाचे सगळेच पदार्थ आजकाल वर्षभर खायला मिळत असले तरीही, दिवाळीत केल्या जाणाऱ्या फराळाची चव काही वेगळीच असते. घरच्या स्त्रिने इतकी मेहेनत घेऊन केलेला फराळ आपण दिवाळी संपली तरीही किमान पुढचा महिनाभर तरी खातोच. असा फराळ खाताना तो संपेपर्यंत त्याच्या चवीत बदल न होता तो आहे तसाच खाण्यासाठी फ्रेश राहावा, यासाठी फराळ स्टोअर करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. आत्तापर्यंत सगळ्यांच्याच घरात फराळ बनवून तयार असेल. तेव्हा हा फराळ महिनाभर फ्रेश राहण्यासाठी सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी काही खास टिप्स शेअर केल्या आहेत(how to store diwali faral properly to keep faral fresh for long time).
१. फराळ नेहमी स्टीलच्याच डब्यांत स्टोअर करावा.
फराळाचे पदार्थ तयार करुन झाल्यावर शक्यतो ते स्टीलच्याच डब्यांत स्टोअर करून ठेवावेत. यामुळे फराळाचे पदार्थ पुढील किमान महिनाभर तरी चांगले फ्रेश राहतात. काहीजण प्लॅस्टिकच्या डब्यांत फराळ स्टोअर करुन ठेवतात, परंतु हे चुकीचे आहे. काहीवेळा प्लॅस्टिकच्या डब्यांचे झाकण व्यवस्थित न लागल्याने हवा आत जाऊन चिवडा, शेव यांसारखे कुरकुरीत पदार्थ हवा लागून मऊ पडतात. यासोबतच काहीवेळा पदार्थांची चव देखील बदलते त्यामुळे फराळाचे पदार्थ कायम स्टीलच्याच डब्यांत स्टोअर करून ठेवावे. स्टीलसोबतच आपण पितळेच्या कलई केलेल्या डब्यांचा देखील वापर करु शकतो.
फराळात विकतसारख्या आलू भुजिया करण्याची झटपट सोपी रेसिपी, कुरकुरीत-चटपटीत आलू भुजिया होतील फस्त!
२. फराळ स्टोअर करून ठेवलेल्या डब्यांची झाकणं व्यवस्थित लागल्याची खात्री करा.
आपण फराळ ज्या डब्यांत स्टोअर करुन ठेवणार आहोत, त्या डब्यांची झाकण व्यवस्थित घट्ट लागतात याची खात्री करुन घ्या. जर डब्यांची झाकणं लूज असतील तर अशा डब्यांत फराळ स्टोअर करु नका. लूज झाकणं असलेल्या डब्यांतून हवा आत जाऊन आतील पदार्थ मऊ पडू शकतात, किंवा कालांतराने त्यांच्या चवीत थोडाफार फरक जाणवू शकतो.
३. डब्यांची झाकणं लावण्यापूर्वी टिश्यू पेपरचा वापर करा.
फराळ डब्यांत स्टोअर करून ठेवण्यापूर्वी या डब्यांच्या तळाशी टिश्यू पेपर अंथरुन घ्यावा. यामुळे लाडू सारखे पदार्थ डब्यांच्या तळाशी चिकटत नाही. याचबरोबर फराळाचे बहुतेक पदार्थ हे तळणीचेच असतात. त्यामुळे या पदार्थांमधील अतिरिक्त तेल डब्यांच्या तळाशी उतरते. अशावेळी डब्यांच्या तळाशी टिश्यू पेपर असल्याने हे जास्तीचे तेल टिश्यू पेपर शोषून घेते. यामुळे डबेही खराब होत नाहीत तसेच पदार्थातील जास्तीचे तेल शोषून घेतले जाऊन ते फारसे तेलकट होत नाहीत, यामुळे पदार्थांतून तेल न गाळता ते खूप दिवस आहेत तसेच फ्रेश राहतात. यासोबतच जर डब्याचे झाकणं लूज लागत असेल तर डब्यांवर आधी संपूर्णपणे टिश्यू पेपर अंथरुन घ्यावा, त्यानंतर त्यावर झाकणं लावावे यामुळे डब्याचे झाकणं घट्ट बसते.
४. फराळाचे पदार्थ नॉर्मल टेम्परेचरला आल्यावरच डब्यांत भरुन स्टोअर करा.
फराळाचे पदार्थ गरम असताना डब्यांत भरण्याची चूक करु नका. पदार्थ गरम असताना डब्यांत भरले तर ते खराब होऊ शकतात किंवा मऊ पडतात. यासाठीच फराळाचे पदार्थ डब्यांत भरून ठेवण्यापूर्वी आधी ते थोडे थंड होऊन नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्या. मगच ते डब्यांत भरा, यामुळे पदार्थ किमान महिनाभर तरी चांगले टिकून राहतात.
५. फराळ स्टोअर करण्यासाठी स्वच्छ कोरड्या डब्यांचा वापर करा.
फराळ स्टोअर करण्यासाठी नेहमी स्वच्छ आणि कोरड्या डब्यांचाच वापर करावा. जर डबा आतून अस्वच्छ किंवा त्यात पाण्याचा जरासा जरी अंश असेल तर फराळाचे पदार्थ लगेच या ओलाव्याने खराब होऊ शकतात. यासाठीच डब्यांत फराळ स्टोअर करण्यापूर्वी डबा स्वच्छ धुवून कोरडा करावा, आणि स्वच्छ सुती कापडाने एकदा पुसून घ्यावा किंवा ऊन्हात वाळवावा.