आपल्याकडे नाश्त्याला बरेचदा इडली, डोसा, मेदू वडा, उत्तपा असे साऊथ इंडियन पदार्थ आवडीने खाल्ले जातात. कधी आपण हे पदार्थ कुठल्या उडप्याकडून आणतो तर कधी घरीच बनवून खातो. इडली दिसायला पांढऱ्या शुभ्र रंगाची खाण्यासाठी मऊ आणि पचण्यासाठी हलकी असते. उडीद डाळ, तांदूळ भिजवून, बारीक वाटून, आंबवून इडली बनविली जाते. इडली नारळाची चटणी किंवा सांबर यांसोबत सर्व्ह केली जाते. आरोग्यासाठी इडली उत्तम आहार आहे. इडली हा एक असा एक पदार्थ आहे जो तुम्ही सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण अथवा संध्याकाळी आणि रात्रीदेखील खाऊ शकता. त्यामुळे आजकाल घरोघरी या साऊथ इंडियन पदार्थांची लोकप्रियता वाढतच जात आहे.
इडली हा असा पदार्थ आहे की तो योग्य पद्धतीने फुलून आला तरच खायला मजा येते. फुगलेली, मऊ, टम्म इडली खाण्यात जो आनंद आहे तो इतर कशातच नाही. आपल्याकडे बहुतेकदा सकाळच्या नाश्त्याला इडली आवडीने बनवून खाल्ली जाते. इडली, डोसा हे पदार्थ बनवायचे म्हणजे त्याचे पीठ व्यवस्थित तयार करण्यापासून ते इडली, डोसा बनवून होईपर्यंत खूप मोठा टास्क एखाद्या गृहिणींपुढे असतो. इडली, डोशाचे पीठ तयार करताना त्यात डाळ व तांदूळ यांचे प्रमाण योग्य असले पाहिजे. नाहीतर काहीवेळा हे पीठ फसू शकते. एकदा का हे इडली डोशाचे पीठ फसले तर आपल्या मनासारख्या इडल्या तयार होत नाहीत. मग या न फुगलेल्या दडदडीत इडल्या खायला नकोशा वाटतात. इडल्या व्यवस्थित फुगून येण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवूयात(How To Make A Idli Soft And Fluffy).
इडल्या फुगून येण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ?
१. इडल्या फुगून येण्यासाठी इडली बॅटर तयार करताना त्यात एक वाटी शिजवलेला भात घालावा म्हणजे इडल्या पाहिजे तशा फुलून येतात.
२. इडल्या नीट फुगून न येता कडक किंवा दडदडीत, जाड होत असतील तर इडली बॅटर तयार करताना त्यात एक वाटी भिजवलेले पोहे घालावेत. या भिजवलेल्या पोह्यांमुळे इडल्या फुगून येण्यास मदत होते.
३. इडल्या फुगून येण्यासाठी त्यात एक टेबलस्पून इनो घालून त्यावर जरासा लिंबाचा रस मिसळून हे इडली बॅटर परत ढवळून घ्यावे. यामुळे इडल्या फुगून येतात.
४. इडली बॅटरसाठी पॉलिश केलेली उडीद डाळ वापरू नका कारण पॉलिश करण्यासाठी फॅक्टरीमध्ये त्यावर प्रोसेस करण्यात येते. या प्रोसेसमध्ये डाळीमधील आवश्यक बॅक्टेरिआ नष्ट होतात. डाळीतील हे बॅक्टेरिआ इडलीचे बॅटर आंबवण्याची महत्वाची (Fermentation) प्रक्रिया करतात.
५. इडली चविष्ट आणि स्पॉंजी होण्यासाठी पॉलिश न केलेली उडीद डाळ वापरा. मात्र ही डाळ थोडी काळपट असल्यामुळे ती स्वच्छ करताना हातावर चांगली चोळून स्वच्छ करा.
डोसा तव्याला चिकटू नये म्हणून ७ सोप्या टीप्स, डोसा तव्याला न चिकटता होईल हॉटेलसारखा कुरकुरीत...
६. इडली परफेक्ट होण्यासाठी इडली राईस अथवा इडली रव्याचा वापर करा ज्यामुळे इडली सॉफ्ट आणि स्पॉंजी होईल.
७. डोसा बॅटरपेक्षा इडलीच्या बॅटरला जास्त फर्मेंटेशनची गरज असते. त्यामुळे डोसा बॅटरने इडली करू नये.
८. इडली पात्रात बॅटर घालण्यापूर्वी इडलीच्या साच्यांना तेल लावावे ज्यामुळे स्टीम झाल्यावर इडली पटकन निघते आणि चिकटून राहत नाही.
९. इडली फक्त पंधरा ते वीस मिनिटेच स्टीम करावी, जास्त उकडल्यास इडली कोरडी आणि कडक होऊ शकते.
इडली - डोसा - आप्पे, पदार्थ ३ - पीठ १! असे मल्टिपर्पज परफेक्ट पीठ कसे बनवायचे, पाहा कृती....
जाळीदार डोसे, लुसलुशीत इडली हवी? पाहा डाळ तांदूळ प्रमाण गणित, करा परफेक्ट साऊथ इंडियन पदार्थ...
१०. इडलीचे बॅटर तयार करताना पाण्याचे प्रमाण अचूक असावे. जास्त किंवा कमी पाणी यामुळेही इडली खराब होऊ शकते. इडलीचे बॅटर सॉफ्ट आणि वेलवट टेक्चरचे असणे म्हणजे ते परफेक्ट झाले आहे असे समजावे.
११. इडलीच्या बॅटरमध्ये टेबल सॉल्ट ऐवजी रॉक सॉल्ट वापरा. कारण त्यामुळे इडलीच्या आंबण्याच्या प्रोसेसमध्ये अडथळा येणार नाही. तुम्ही इडलीचे बॅटर तयार करताना अथवा ते आंबल्यावर असं कधीही मीठ त्यात टाकू शकता. थंडीत फर्मेटेशनची प्रकिया उशीरा होत असल्यामुळे शेवटी मीठ घालणं फायद्याचं ठरेल. उन्हाळ्यात मात्र जास्त फर्मेंटेशन टाळण्यासाठी तुम्ही रात्री पीठ तयार केल्यावरही त्यात मीठ घालू शकता.