उन्हाळा ऋतू म्हटलं की आपल्याला डिहायड्रेशनची समस्या सारखी सतावते. उन्हाळ्यात कितीही पाणी प्यायलं तरीही आपली तहान काही केल्या भागत नाही. अशावेळी आपण वेगवेगळ्या रसाळ फळांचे ज्यूस, सरबत, रसदार व पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खाण्यावर जास्त भर देतो. उन्हाळ्यात आपण शरीराला थंडावा मिळवून देण्यासाठी कलिंगड, टरबूज, शहाळ्याचे पाणी, काकडी, द्राक्षे यांसारख्या रसदार फळांचा आपल्या आहारात समावेश करतो.
सॅलेडमध्ये वापरली जाणारी काकडी सगळ्यांनाच आवडते. काकडीतून आपल्या शरीराला अनेक आवश्यक पोषक घटक आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात. काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे अनेक शहरांमध्ये उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला काकडी कापून त्यावर मीठ - मसाला भुरभुरवून देणाऱ्या विक्रेत्यांचे ठेले आपल्याला पाहायला मिळतात. शक्यतो उन्हाळ्याच्या ऋतूंत काकडीच रायत, काकडीची थंडगार कोशिंबीर किंवा काकडी कापून खाल्ली जाते. उन्हाळ्यात तर काकडी जास्तीत जास्त खाल्ली पाहिजे. कारण काकडीमध्ये ८०% पाणी असते, ज्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण पुरेसे राखले जाण्यास मदत होते. काकडीमध्ये असलेल्या बहुगुणी पोषक तत्त्वांमुळे उन्हाळ्यात होणाऱ्या डिहायड्रेशन व इतर आजारांपासून काकडी आपला बचाव करु शकते. उन्हाळ्यात नुसती काकडी खाऊन कंटाळा आला असेल तर काकडीचे कुकुंबर बोट्स घरच्या घरी नक्की ट्राय करुन पाहा(How To Make A Stuffed Cucumber Boat Recipe At Home).
साहित्य :-
१. काकडी - २ ते ४
२. बारीक चिरलेला कांदा - १ कप
३. बारीक चिरलेला टोमॅटो - १ कप
४. बारीक चिरलेली हिरवी ढोबळी मिरची - १ कप
५. बारीक चिरलेली हिरवी मिरची - १ टेबलस्पून
६. उकडवून घेतलेले मक्याचे दाणे - अर्धा कप
७. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून
८. चाट मसाला - १/२ टेबलस्पून
९. काळं मीठ - १/२ टेबलस्पून
१०. लिंबाचा रस - १ टेबलस्पून
११. कोथिंबीर - १ टेबलस्पून
१२. पिवळी बारीक शेव - अर्धा कप
कृती :-
१. सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून तिच्या बाहेरील साल काढून त्या काकडीला उभे चिरुन तिचे २ भागात विभाजन करावे.
२. या काकडीच्या मधील गर एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घ्यावा. काकडीच्या मधील गर काढल्याने काकडीचा एकाद्या पोकळ बोटीसारखा आकार होईल.
३. आता एका मोठ्या बाऊलमध्ये हा काकडीचा गर घेऊन त्यात बारीकचिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, हिरवी ढोबळी मिरची, हिरवी मिरची, मक्याचे दाणे घालूंन सगळे जिन्नस एकजीव करुन स्टफिंग बनवून घ्यावेत.
अजिबात पाणी न सुटलेली काकडीची परफेक्ट कोशिंबिर उन्हाळ्यात ताटात हवीच, पाहा कूल रेसिपी..
४. त्यानंतर यात चवीनुसार काळीमिरी पूड, चाट मसाला, काळं मीठ, लिंबाचा रस, कोथिंबीर बारीक चिरुन घालावी. आता हे सगळे जिन्नस एकजीव करुन घ्यावेत.
५. आता काकडीचा मधील गर काढून घेतलेल्या काकड्या घेऊन त्यात हे इतर भाज्यांचे तयार केलेले स्टफिंग भरुन घ्यावे.
६. सर्वात शेवटी या सगळ्या काकड्यांमध्ये स्टफिंग भरुन झाल्यानंतर पिवळी बारीक शेव वरुन भुरभुरवून घ्यावी.
कैरीचा आंबटगोड पुलाव, करायला अगदी सोपा आणि उन्हाळ्यात खायचे सुख, शेफ कुणाल कपूरची रेसिपी...
कुकुंबर बोट्स खाण्यासाठी तयार आहेत.