शर्मिला मिलिंद सुरळकर, ठाणे
भाताचे मुटके हा पारंपरिक प्रकार करुन पाहा. अतिशय चविष्ट, करायला सोपा. उरलेल्या भाताचेही हे मुटके करता येतात. अन्न वाया घालवण्याचा प्रश्न नाही आणि गरमागरम नाश्ताही तयार होतो. माझी आई मी लहान असताना आमच्या घरी हे बरेचदा करायची. कारण मी भाज्या खात नव्हते तर आई मला अशाप्रकारे खाऊ घालायची. आणि मी नेहमी शाळेत डब्यात घेऊन जायचे. खूप आवडीने मी खायचे. अजूनही मी ही रेसिपी माझ्या घरी बनवते. सगळे आवडीने खातात. आणि मी नेहमी सांगते घरात सगळ्यांना माझी आई मला न कळत यातून भाज्या खाऊ घालायची (Different Recipe from Rice).
भाताचे मुटके कसे करायचे?
साहित्य :
दोन वाटी भात, पाव वाटी ज्वारी चे पीठ, पाव वाटी गव्हाचे पीठ , दोन चमचे बाजरी पीठ, आलं-लसूण- हिरवी मिर्ची -कोथिंबीर जिरे यांची दोन चमचे पेस्ट करुन घ्या. दूधी भोपळा ५० ग्राम, लाल भोपळा ५० ग्राम, गाजर पाव वाटी , तेल फोडणी साठी, मोहरी, हिंग , लाल मिरच्या दोन , कढीपत्ता, कोथिंबीर .
कृती :
१. भात हलकासा मिक्सर मध्ये बारीक करा. त्यात सगळी पिठे घालून घ्या.
२. आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाका. थोडी हळद चवीनुसार मिठ, हिंग घाला.
३. दुधी, लाल भोपळा, गाजर, हे सगळे किसून टाका. थोडी कोथिंबीर घाला.
४. हे सगळं भातात टाकून एकजीव करून घट्ट सर मळून घ्या. मग त्याचे छोटे मुटके करून १५ मिनिट मिडीयम गॅस वर वाफवा.
५. मग मुटके थंड झाले की गोल गोल पातळ असे कापून घ्या. मग एक कढई गॅसवर ठेवा त्यात फोडणीसाठी तेल गरम करावे/ तेल गरम झाले की त्यात मोहरी हिंग कढीपत्ता लाल मिर्ची टाकावी आणि त्यात तुकडे केलेले मुटके टाकावे चांगले परतून घ्या.
६. यावर मग लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून छान परतवा, मुटके तयार.