दिपाली दिलीप उपगनलावार, नाशिक
भोपळ्याचे वडे. हा पदार्थ माझ्या आईची आठवण आहे. माहेरी असताना हा पदार्थ आईच्याच हातची खायची सवय होती,=. पण कधी करून बघितला नाही. माझ्या लग्न झाल्यानंतर १५ वर्षांनी माझ्या आईला कॅन्सर झाला होता, तेव्हा मुंबईला ती टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याकरता माझ्याकडे आली होती. देवा घरी जाण्यापूर्वी एक महिना आधी मला ही रेसिपी शिकवून गेली. आईला किचनमध्ये खुर्चीवर बसवून ही रेसिपी कशी करायची हे सांगत होती. म्हणून आयुष्यभर आईची आठवण म्हणून ही रेसिपी मला माझ्या मनात राहील. दुधी भोपळ्याचे पौष्टिक व खमंग वडे(How to make a traditional Maharashtrian dish- bhoplyache vade, bottle gourd or calabash cucumber special recipe, lokmatsakhi food contest).
दुधी भोपळ्याचे वडे कसे करायचे ?
साहित्य :- २०० ग्रॅम दुधी भोपळा, १२५ ग्राम तांदुळाचे पीठ, ५० ग्रॅम सातूचे पीठ, १ चमचा बेसन, आलं, लसूण, मिरचीची भरड दोन चमचे, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, एक चमचा धणे, जिरे पावडर एक चमचा, मीठ चवीनुसार, तीळ, ओवा, कोथिंबीर आवडीनुसार, दोन चमचे लिंबाचा रस किंवा दही व तळण्यासाठी तेल.
कृती :- सर्वप्रथम दुधी भोपळा किसून त्यात सर्व साहित्य टाकून घट्ट गोळा मळून घ्यावा व त्याचे छोटे छोटे गोल गोल वडे करून गुलाबी रंगावर तेलात कुरकुरीत तळून घ्यावे हे वडे दही टमाटर सॉस किंवा चिंचेच्या चटणी सोबत सर्व्ह करावे. सोबत तळलेल्या मिरच्याही ठेवाव्या.
फार साहित्य नाही, वेळ कमी लागतो आणि वडे झटपट होतात.
दुधी भोपळ्याच्या खमंग पौष्टिक व कुरकुरीत वड्यांची ही रेसिपी आहे. लोकमत सखी डॉट कॉमने केलेलं आवाहन, वाचून माझ्या आईची आठवण आली आणि रेसिपी पाहून डोळ्यात पटकन पाणी आलं.