Lokmat Sakhi >Food > गव्हाच्या कोंड्याचे धापोडे करण्याची पारंपरिक कृती, ९९ वर्षांच्या आजीची माया!

गव्हाच्या कोंड्याचे धापोडे करण्याची पारंपरिक कृती, ९९ वर्षांच्या आजीची माया!

गव्हाच्या कोंड्याचे धापोडे हा पारंपरिक पदार्थ, तो पौष्टिकही आहे चविष्टही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2023 10:52 AM2023-08-18T10:52:53+5:302023-08-18T10:54:07+5:30

गव्हाच्या कोंड्याचे धापोडे हा पारंपरिक पदार्थ, तो पौष्टिकही आहे चविष्टही!

how to make a traditional maharashtrian dish-gavhachya kondyache dhapode, lokmatsakhi food contest | गव्हाच्या कोंड्याचे धापोडे करण्याची पारंपरिक कृती, ९९ वर्षांच्या आजीची माया!

गव्हाच्या कोंड्याचे धापोडे करण्याची पारंपरिक कृती, ९९ वर्षांच्या आजीची माया!

Highlights हे धापोडे तुम्ही तळुनही घेऊ शकता ,भाजून किंवा कच्चेही खाऊ शकता.

सौ. सुलभा सतीश घुसे, अंजनगाव सूर्जी

आता पावसाळा आला असला तरी आमच्याकडे कुरकुरीत खाण्याची मजा असते. कारण उन्हाळ्यात केलेली वाळवळ बेगमी. गव्हाच्या कोंड्याचे धापोडे. हा पदार्थ उन्हाळयात केला की वर्षभर तोंडाला छान चव येते. . आता गव्हाच्या कोंड्याची पौष्टिक चर्चा होते, मात्र हा पारंपरिक पदार्थ त्याबाबतीतही सरस आहे.
ही रेसिपी लिहीत असताना कितीतरी लहानपणच्या आठवणी उचंबळून आल्या. ही रेसिपी माझ्या आजीची आहे. सध्या ती ९९ वर्षाची आहे.आम्ही लहान असताना उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर आजोळी जात असू. आजीने मोठ्या एका टोपल्यामध्ये या गव्हाच्या कोंड्याच्या धापोड्या बनवलेल्या असायच्या. आजीने त्यावर कापड टाकलेले असायचे आणि जाता येता आम्ही त्या खायचो. आमच्या खिशात भरून घ्यायचो. मंदिरामध्ये चोर पोलीस खेळत असताना खिशातले कुरकुरीत धापोडे खायचो आणि आवाजामुळे पकडले जायचो. मावस बहीण, भावंड, मामेबहीण, भावंड अशी आमची टीम असायची आणि शेतात जातानाही हे धापोडे सोबत घेऊन जायचो.

 

गव्हाच्या कोंड्याचे धापोडे?
साहित्य-

          गव्हाचा चिक काढल्यानंतर फेकण्याचा कोंडा, तीळ, लसणाची पेस्ट,कोथिंबीर,चवीपुरतं मीठ,  लाल मिरची.
कृती-
      एका पातेल्यात दोन ग्लास पाणी घेऊन गॅसवर ठेवून उकळून घ्यावे. त्यात मीठ टाकावे. आपण गव्हाच्या चिकाच्या कुरडया करतो त्या कुरड्या करताना उरलेला कोंडा दोन वाट्या घ्या.  त्या उकळत्या पाण्यामध्ये टाका आणि चमच्याने घोटत राहा. पंधरा-वीस मिनिटं झाल्यानंतर गॅसचा फ्लेम कमी करून त्यावर झाकण ठेवावे. मंद आचेवर पाच मिनिटापर्यंत होऊ द्यावे. जे सारण तयार झाले ते एका परातीत काढून थंड होऊ द्यावे. त्यामध्ये तीळ, लसूण पेस्ट ,कोथिंबीर, क्रश केलेली मिरची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करावे. त्याचे गोळे बनवून घ्यायचे. प्लास्टिकला हलक्या हाताने तेल लावून त्यावर हे गोल गोळे थापून घ्यावे. दोन दिवस उन्हात वाळवल्यानंतर गव्हाच्या कोंड्याचे धापोडे तयार होतात. हे धापोडे तुम्ही तळुनही घेऊ शकता ,भाजून किंवा कच्चेही खाऊ शकता.

 

Web Title: how to make a traditional maharashtrian dish-gavhachya kondyache dhapode, lokmatsakhi food contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.