Join us  

कैरीचा सिझन आहे तर घरच्याघरीच करा आमचूर पावडर; विकतपेक्षा भारी- लज्जत न्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 7:49 PM

Aamchoor Powder Recipe: वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकण्यासाठी उपयुक्त ठरणारी आमचूर पावडर बनविण्याची ही बघा एक सोपी रेसिपी... 

ठळक मुद्देआमचूर पावडरमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तिचा उपयोग होतो.

वरण, एखादी भाजी, पाणीपुरीचं पाणी, सरबत अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकण्यासाठी आमचूर पावडर अतिशय उपयुक्त ठरते. दही, टोमॅटो, लिंबू असे कोणतेच आंबट पदार्थ जेव्हा घरात उपलब्ध नसतात, तेव्हा त्याऐवजी आपण आमचूर पावडर बिंधास्तपणे वापरू शकतो. पदार्थांची चव खुलविणारी आमचूर पावडर आरोग्यासाठीही अतिशय पोषक आहे. त्यामुळेच तर सध्या कैरीचा (raw mango) सिझन आहे, तर या संधीचा फायदा घ्या आणि घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने आमचूर पावडर (aamchoor powder at home) तयार करा. 

 

आमचूर पावडर खाण्याचे फायदे (health benefits of aamchoor powder)- आमचूर पावडरमध्ये व्हिटॅमिन सी (vitamin c) मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती (immunity) वाढविण्यासाठी तिचा उपयोग होतो.- फायबरचे प्रमाणही उत्तम असते. त्यामुळे अपचनाचा (indigestion) त्रास होत असल्यास आमचूर पावडर खावी.- डोळ्यांसाठी आणि केसांसाठी फायदेशीर ठरणारे बीटा कॅरेटीन आमचूर पावडरद्वारे मिळते.- आमचूर पावडरमध्ये ॲण्टीहायपरलिपेमिक गुण असतात. त्यामुळे तिचे सेवन हृदयासाठीही उत्तम मानले जाते.- त्यातला मँगीफेरीन हा घटक शरीरातील विषारी द्रव्ये शरीराबाहेर फेकण्यास मदत करतो.- आमचूरमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने ॲनिमियाचा त्रास असणाऱ्यांनी वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून आमचूर पावडरचे सेवन करावे. 

 

कशी करायची आमचूर पावडर?- आमचूूर पावडर बनविण्यासाठी आपल्याला कैरी आणि मीठ या दोनच गोष्टी लागणार आहेत. - साधारण ३ ते ४ मध्यम आकाराच्या कैऱ्या घेऊन आपण आमचूर पावडर करूया.- यासाठी सगळ्यात आधी कैरी धुवून घ्या. त्याचं देठ चाकूने कापून टाका.- यानंतर कैरीचे सालं काढून घ्या आणि साल काढल्यावर लगेचच कैरी पाण्यात भिजत टाका.- सगळ्या कैऱ्यांची सालं काढून झाल्यानंतर चिप्स तयार करण्याची किसणी वापरून कैरीच्या पातळ चकत्या करून घ्या.- या चकत्याही लगेचच पाण्यात भिजत टाकाव्यात. नाहीतर त्या लगेचच काळ्या पडतात.

- आता सगळ्या कैऱ्यांच्या चकत्या करून झाल्यानंतर चकत्या पाण्यातून बाहेर काढा. पाणी व्यवस्थित निथळून घ्या.- एका सुती कापडावर कैरीच्या चकत्या पसरवून ठेवा. दुसरा एखादा कपडा घेऊन चकत्यांवरचं पाणी पुसून त्या कोरड्या करून घ्या. नंतर या सगळ्या चकत्या २ ते ३ दिवस उन्हात ठेवून द्या.- २- ३ दिवसांनंतर कैरीच्या चकत्या अगदी कडक वाळल्या असतील. या चकत्या मिक्सरमध्ये टाका. त्यात अर्धा टेबलस्पून मीठ टाका आणि मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घ्या.- एअरटाईट डब्यात ठेवल्यास आणि ओला हात न लागू दिल्यास ६ महिने तरी ही पावडर उत्तम टिकते. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.समर स्पेशल