रोज आपला तोच छळकुटा प्रश्न. डब्याला काय करायचं? त्यातही मुलांच्या छोट्या सुट्टीच्या डब्यासाठी नाश्ता म्हणून, पोटभरीचं, पोषक, झटपटही होईल मुलांनाही आवडेल असं नेमकं काय करायचं हा प्रश्न घरोघर असतोच. आईच्या डोक्याला भूंगा. आज काहीतरी भारी दे. तर त्यासाठीच ही एकदम चविष्ट मस्त रेसिपी. करायला सोपी आणि बाकीचे सगळे क्रायटेरिया टिकमार्क सहज करणारी. मुळात हा पदार्थ आंध्रप्रदेशचा आहे. त्याचं नाव डिब्बा रोटी/मीनापा रोटी. डिब्बा रोटी कशी करायची याचे अनेक व्हिडिओ युटयूबवर आहेतच, पण कृती एकदा समजून घेतली तर तुम्ही या डिब्बा रोटीचेच मनाला आवडतील असे अनेक प्रकारही करु शकाल.इडली ,डोसा, उत्तप्पा, याचा कंटाळा येतो तेव्हा हा पदार्थ उत्तम. म्हणायला पदार्थाचं नाव रोटी असलं तरी यात ना गहू आहेत ना पोळ्या, पराठे लाटायचे आहेत. हा डोसा, उत्तपा कुटुंबातलाच प्रकार. पण जरा अधलामधला आणि करायला सोपा.
(Image : Google)
कशी करतात डिब्बा रोटी?
साहित्य-
इडली रवा १ वाटी, उडीद डाळ १/२वाटी, जिरे अर्धा चमचा, आणि मीठ, साखर, तेल किंवा तूप.हे बेसिक पदार्थ. बाकी सगळे ऐच्छिक.काजू/ राई, चणाडाळ ,कढीलिंब, लाल सुक्या मिरच्या यांची फोडणी/ कांदा हिरवी मिरची, रंगीत बारीक चिरलेल्या मिरच्या, बारीक तुकडे पनीर, थोडं चीज असं काहीही ॲड ऑन. मुख्य पदार्थात हे चीज, पनीर अजिबात नसतं. पण मुलांसाठीच करायचं आणि त्यांना आवडत असेल तर ते ही वापरता येतं.
(Image : Google)
कृती
उडीद डाळ साधारण चार तास भिजत घालावी. रवा फक्त पंधरा मिनिटे भिजवावा आणि पिळून घ्यावा. डाळ वाटावी. रवा आणि वाटलेली डाळ मिक्स करावी. मग आपल्याला हवं ते साहित्य एकत्र करावं. खोलगट कढईत तेल/तूप घालून गरम करावे.त्यात डाळ रव्याचे मिश्रण घालावे. मिश्रण पातळ पसरू नये,जाडसर हवे,केक सारखं. मंद आगीवर दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे,वाटल्यास बाजूने तेल/तूप सोडत राहावे. खमंग डब्बा रोटी तय्यार. केकसारखे तुकडे करून घ्यावे. सोबत चटकदार टोमॅटो चटणी भन्नाट लागते. आवडत असेल तर भाजीसोबत, हिरव्या चटणीसोबतही खा. काहीजणांना घाई असते तर ते मिश्रणातच हिरव्या मिरच्या पुरेशा घालतात. तिखट रोटीही खायला छान लागते.