कढी पकोडा हा गुजरात, राजस्थानमध्ये लोकप्रिय असलेला पदार्थ आता सगळ्याच भारतीयांचा आवडीचा झाला आहे. मस्त गरमागरम आंबट - गोड काढीत सोडलेले खुसखुशीत तिखट पकोडे यांच्या चवीचा मेळ अजबच म्हणावा लागेल. एरव्ही आपण जेवणात महाराष्ट्रीयन कढी बनवतोच. ताक, दही हे आपल्या महाराष्ट्रीयन थाळीचा एक अमूल्य भाग आहे. रोजच्या जेवणात आपण पानांत तोंडी लावायला म्हणून दही घेतो किहवा कोशिंबिरीमध्ये दही घालून मनसोक्त खातो. याच दह्याचा वापर करुन आपण त्याचे अनेक पदार्थ बनवू शकतो.
रोजच्या जेवणात तेच आमटी, वरण, उसळ खाऊन कंटाळा आला असल्यास मस्त गरमागरम कढी पकोडा हा एक उत्तम पर्याय असू शकतो. आपल्या घरात दही किंवा ताक हे नेहमीच जास्तीच असत. अशावेळी आपण झटपट कढी पकोडा बनवून भातासोबत खाऊ शकतो. कढीचे वेगवेगळे प्रकार मस्त होतात. हिंग, ओवा, मिरची यांच्या प्रमाणानुसार आणि वापरानुसार त्यांची चव बदलते. हिरवी मिरची फोडणीत घालून केलेली कढी आणि लाल मिरचीची वरून फोडणी देऊन केलेली कढी, यांची चवही वेगळी असते. कढी करताना तिच्या दाटपणानुसार चवीत बदल होत असतो. जास्त पातळ कढीही चांगली लागत नाही आणि जास्त दाट झाली, की तिचं पिठलं होतं. पकोडे या कढीत घातल्यानंतर काही वेळ तसंच हे मिश्रण गरम होऊ दिलं, तर त्याला एक झकास चव येते आणि ते एकजीव होतं. कढीत मुरलेले हे पकोडे मग खायलाही मस्त लागतात. कढी पकोडे बनवायचे कसे याचे साहित्य, कृती लक्षात घेऊ(How To Make Authentic Kadhi Pakora Recipe).
साहित्य :-
१. कढी बनविण्यासाठी :-
१. दही - २५० ग्रॅम
२. बेसन - १ टेबलस्पून
३. पाणी - गरजेनुसार
४. तेल - २ ते ३ टेबलस्पून
५. लसूण पाकळया - ३ ते ४
६. लाल सुकी मिरची - १ ते २
७. आलं - छोटा तुकडा
८. राई - १ टेबलस्पून
९. जिरे - १ टेबलस्पून
१०. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ (बारीक चिरुन घेतलेल्या)
११. कढीपत्ता - ५ ते ६ पाने
१२. हिंग - चिमूटभर
१३. हळद - १/२ टेबलस्पून
१४. मीठ - चवीनुसार
१५. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेली)
थालीपीठ करायचं पण भाजणीचं पीठच नाही? झटपट करा मिक्स पिठांचे खमंग मेथी थालीपीठ, पौष्टिक आणि पोटभर...
२. पकोडा बनविण्यासाठी :-
१. कांदा - १ कप (बारीक चिरुन घेतलेला)
२. हिरव्या मिरच्या - २ ते ३ (बारीक चिरुन घेतलेल्या)
३. धणे पावडर - १ टेबलस्पून
४. हळद - १ टेबलस्पून
५. हिंग - चिमूटभर
६. ओवा - १/२ टेबलस्पून
७. मीठ - चवीनुसार
८. कोथिंबीर - १/२ टेबलस्पून
९. बेसन - १ कप
१०. पाणी - गरजेनुसार
कृती :-
कढी बनविण्याची कृती :-
१. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यात किंचित पाणी घालून त्याची जाडसर पेस्ट तयार करुन घ्यावी. ही पेस्ट दह्यात मिसळून मग दही व ही बेसनाची पेस्ट एकजीव करुन घ्यावे.
२. एका कढईत तेल घेऊन त्यात लसूण पाकळया, लाल सुकी मिरची, आलं, राई, जिरे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हिंग यांची खमंग फोडणी द्यावी.
३. खमंग फोडणी दिल्यानंतर दही व बेसनाची पेस्ट एकत्रित केलेले मिश्रण यात ओतून घ्यावे. सगळ्यात शेवटी यात चवीनुसार मीठ व वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी.
४. त्यानंतर ही कढी ५ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावी.
पकोडे बनविण्यासाठी :-
१. एका बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊन त्यात बारीक चिरुन घेलेल्या हिरव्या मिरच्या, धणे पावडर, हळद, हिंग, ओवा, व चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालून घ्यावे.
२. सर्वात शेवटी यात बेसन व थोडे पाणी घालून भज्यांसारखे घट्ट बॅटर पकोड्यांसाठी तयार करुन घ्यावेत.
३. हे बॅटर थोडे थोडे चमच्यात घेऊन याचे छोट्या छोट्या आकाराचे पकोडे गरम तेलात खरपूस तळून घ्यावेत.
४. पकोडे तळून तयार झाल्यानंतर हे पकोडे कढीत सोडावेत.
प्या गारेगार कोकोनट मँगो मिल्कशेक, उन्हाळा सुसह्य करणारी रेसिपी - हॉटेलपेक्षा भारी चव...
गरमागरम कढी पकोडे खाण्यासाठी तयार आहे. भातासोबत कढी पकोडे खाण्यासाठी सर्व्ह करावेत.