कोणतीही भारतीय जेवणाची थाळी विविध प्रकारच्या चटण्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. चटणी भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. सुक्या व ओल्या अशा दोन्ही प्रकारच्या चटण्या खाण्याची आपल्याकडे पद्धत आहे. पराठा, डोसा, इडली, तळलेले पदार्थ असे अनेक पदार्थ आहेत जे चटणीसोबतच छान लागतात. जेवताना आपल्या पानांत चटणी असली की जेवणाची लज्जत वाढते, मग ती चटणी कोणतीही असो. आपल्या भारतीयांच्या जेवणामध्ये चटणी ही तोंडी लावायला असतेच. चटणी - भाकरी हे दोन्ही पदार्थ पूर्वीच्या लोकांना मिष्ठांन्ना सामान होते. ते चटणी भाकरी खाऊन दिवस काढत असत, आज देखील चटणीचे जेवणातील महत्व काही कमी झालेले नाही.
चटणी बनवण्याचे विविध प्रकार आहेत. जवस चटणी, शेंगदाणा चटणी, कारळ्याची चटणी, तिळाची चटणी, खोबर्याची चटणी, लसूण खोबरे चटणी, कढीपत्त्याची चटणी, कैरीची चटणी यांखेरीस देखील अजून विविध प्रकारच्या चटणी भारतीय घरांत हमखास बनवल्या जातात. चटणी स्वादिष्ट असण्याव्यतिरिक्त यामध्ये पोषक तत्त्वांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. जेवायला बसल्यानंतर भात, भाजी, चपाती व्यक्तीरिक्त काहीतरी चटपटीत, तिखट तोंडी लावणीसाठी असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. सहसा बहुतेक घरांमध्ये केली जाणारी शेंगदाण्याची चटणी सगळ्यांच्याच खूप आवडीची आहे. भाजलेल्या शेंगदाण्यांची चटणी अगदी कमीत कमी वेळात तयार होते आणि जास्त मेहनतही करावी लागत नाही. जर भाजी बनवली नसेल तर चपातीबरोबर, खिचडीबरोबर किंवा डाळ भातसह ही चटणी आपण खाऊ शकता(How To Make Authentic Solapuri Style Peanut Dry Chutney In Just 10 Minutes At Home).
साहित्य :-
१. शेंगदाणे - २ कप (शेंगदाणे सुके भाजून घेतलेले)
२. धणे - २ टेबलस्पून
३. लाल सुक्या मिरच्या - ३ ते ४
४. जिरे - २ टेबलस्पून
५. मीठ - चवीनुसार
६. लसूण पाकळ्या - ६ ते ८ (सोलून घेतलेल्या)
७. लाल मिरची पावडर - २ टेबलस्पून
८. हिंग - १/२ टेबलस्पून
कृती :-
१. सर्वप्रथम शेंगदाणे घेऊन ते एका कढईमध्ये सुके भाजून घ्यावेत.
२. भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांच्या साली काढण्यासाठी ते एका मोठ्या डिशमध्ये किंवा सुपात घेऊन हलवावे, किंवा हलक्या हातांनी भरडून साली काढून घ्याव्यात.
३. आता कढईमध्ये धणे, जिरे, लाल सुक्या मिरच्या, चवीनुसार मीठ, हिंग, सोलून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालून हे सर्व जिन्नस सुके भाजून घ्यावेत.
४. हे सर्व जिन्नस भाजून झाल्यानंतर, थोडे गार झाल्यावर मिक्सरला बारीक पूड होईपर्यंत वाटून घ्यावेत. आता या मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या मिश्रणात लाल मिरची पावडर घालून परत एकदा हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
५. त्यानंतर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात भाजून व साली काढून घेतलेले शेंगदाणे घालावेत आता त्यात मिक्सरला बारीक वाटून घेतलेला मसाला घालावा. हे दोन्ही जिन्नस एकत्रित करुन परत एकदा मिक्सरला वाटून त्याची थोडी जाडसर चटणी वाटून घ्यावी.
सुरणाचे खमंग चटपटीत काप करण्याची पारंपरिक कृती; गरमागरम वरणभात आणि सुरण काप-बेत जमणारच..
आपली लाल, तिखट, झणझणीत शेंगदाण्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही तयार झालेली शेंगदाण्याची चटणी आपण एका हवाबंद डब्यात किंवा बरणीत स्टोअर करुन ठेवू शकता.