Lokmat Sakhi >Food > बटाट्याचं झणझणीत भरीत,चवीला असे भारी की वांग्याला तोडीस तोड; करुन पाहा रेसिपी

बटाट्याचं झणझणीत भरीत,चवीला असे भारी की वांग्याला तोडीस तोड; करुन पाहा रेसिपी

सारखी बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आलेल्यांच्या तोंडालाही बटाट्याचं भरीत म्हटलं तर पाणीच सुटणार! करायला एकदम सोपं आणि चवीला झणझणीत बटाट्याचं भरीत करुन पाहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 05:01 PM2022-02-04T17:01:10+5:302022-02-04T17:13:32+5:30

सारखी बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आलेल्यांच्या तोंडालाही बटाट्याचं भरीत म्हटलं तर पाणीच सुटणार! करायला एकदम सोपं आणि चवीला झणझणीत बटाट्याचं भरीत करुन पाहा!

How to make Batata Bharit: Batata Bharit is easy way to twist potato in lips smacking food. | बटाट्याचं झणझणीत भरीत,चवीला असे भारी की वांग्याला तोडीस तोड; करुन पाहा रेसिपी

बटाट्याचं झणझणीत भरीत,चवीला असे भारी की वांग्याला तोडीस तोड; करुन पाहा रेसिपी

Highlightsभरतासाठी उकडलेले बटाटे कुस्करताना एकदम पेस्टसारखे कुस्करु नये, त्यात थोड्या बटाट्याच्या फोडीही राहायला हव्यात.सुके मसाले भाजून त्याचा भरड स्वरुपातली पूड यामुळे बटाट्याच्या भरताला चव येते. थोडं दही आणि साखर घालूनही बटाट्याचं भरीत छान लागतं. उपवासाला असं दही घालून बटाट्याचं भरीत करता येतं. 

भरीत म्हटलं की ते वांग्याचंच असणार. भरीत आणि भाकरी म्हणजे हिवाळ्यातला चविष्ट बेत . या बेताच्या तोडीस तोड आणखी एक बेत करता येईल. शिवाय हा बेत फक्त हिवाळ्यातच भरताचे वांगे चांगले मिळतात म्हणून हिवाळ्यातच करायला हवा असं नाही. कधीही खा, ते छानच लागणार.  सोबत भाकरी असल्यास छानच, पण भाकरी नसली तरी पोळीसोबतही छान लागणार असा हा सोपा पण चविष्ट बेत. बटाट्याचं भरीत आणि पोळी. बटाट्याची भाजी रोज खाऊन कंटाळा आलेल्यांच्या तोंडालाही बटाट्याचं भरीत म्हटलं तर पाणीच सुटेल अशा फक्कड चवीचं बनतं हे.

Image: Google

बटाट्याचं भरीत हा मुळात सिंधी पदार्थ आहे. भारतात उत्तर भारतात बटाट्याचं भरीत केलं जातं. वेगवेगळ्या चवीचं वांग्याचं भरीत केलं जातं तसंच बटाट्याचं भरीतही आपल्याला आवडेल अशा चवीचं करता येतं.  एखाद दिवशी भाजी करण्याचा कंटाळा आला किंवा केलेली भाजी कमी पडेल असं वाटत असल्यास किंवा काहीतरी वेगळी, झणझणीत चवीची भाजी खायची असल्यास बटाट्याचं भरीत हा उत्तम पर्याय आहे.

बटाट्याचं भरीत करण्याची पध्दतही एकदम सोपी. बटाट्याचं भरीत करताना वांग्यासारखं बटाटे भाजण्याची गरज नसते. थोडेसे कच्चे मसाले आणि उकडलेले बटाटे, तिखट मीठ एवढ्या साहित्यात जेवणाला चव आणणारं झणझणीत भरीत करता येतं. 

Image: Google

कसं करायचं बटाट्याचं भरीत?

बटाट्याचं भरीत करताना अर्धा किलो बटाटे, 1 छोटा चमचा  आमचूर पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, 2 ते 3 बारीक चिरलेल्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या, 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा काळे मिरे पूड, 2 छोटे चमचे धने, चिमूटभर हिंग आणि पाव कप तेल घ्यावं. 

Image: Google

बटाट्याचं भरीत करताना आधी बटाटे स्वच्छ धुवून उकडायला ठेवावेत. बटाटे उकडेपर्यंत एका कढईत जिरे, धने, लाल मिरच्या, काळे मिरे मंद आचेवर भाजून घ्यावेत. मसाले भाजले गेले की ते थंडं होवू द्यावे. मसाले थंडं होईपर्यंत बटाटे सोलून ते कुस्करुन घ्यावे. बटाटे कुस्करताना एकदम बारीक पेस्टसारखे कुस्करु  नये. थोड्या त्यात बटाट्याच्या फोडी असायला हव्यात.  कुस्करलेले बटाटे बाजूला ठेवावे. थंडं झालेले मसाले मिक्सरमधून वाटून घ्यावेत. हा मसाला ओबडधोबड असायला हवा. हा मसाला कुस्करलेल्या बटाट्यात घालावा. नंतर त्यात आमचूर पावडर, चाट मसाला आणि मीठ घालावं.

Image: Google

हे सर्व कुस्करलेल्या बटाट्यात नीट मिसळून घ्यावं. नंतर यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालावी. बटाट्याच्या मिश्रणात हे नीट मिसळून घ्यावं. नंतर कढईत तेल गरम करावं. तेल गरम झालं की तेलाला जिरे आणि हिंगाची फोडणी द्यावी. जिरे तडतडले की त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यावा. कांदा परतला गेला की, त्यात मसाले मिसळलेलं बटाट्याचं मिश्रण घालावं. तेलात हे मिश्रण नीट परतून घ्यावं. 5-7 मिनिटं बटाट्याचं मिश्रण मंद आचेवर शिजू द्यावं.  शेवटी मिश्रण पुन्हा एकदा नीट परतून गॅस बंद करुन चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी. हे भरीत हळद न घालताही करता येतं. तसेच गॅस बंद करण्याआधी आवडत असल्यास यात थोडं दही आणि चिमूटभर साखर घातली की बटाट्याचं भरीत आणखी चव देतं. उपवासालाही हे दही आणि साखर घातलेलं बटाट्याचं भरीत छान लागतं. 


 

Web Title: How to make Batata Bharit: Batata Bharit is easy way to twist potato in lips smacking food.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.