मंदिरातल्या महाप्रसादातली बटाट्याची भाजी बहुतेकांनी नक्कीच खाल्लेली असेल. साधी विशेष मसाले आणि सामग्रीचा वापर न करताही केलेली भाजी चवीला आणि रंगाला एकदम छान असते. रस्साही दाट असतो. अशी भाजी घरी पुरी/ पराठ्यांसोबत करायची म्हटलं तर भंडाऱ्यातल्या भाजीप्रमाणे जमतंच नाही. मनात येतं की दिसत नसलं तरी स्पेशल मसाला नक्कीच टाकला जात असेल भाजीत, म्हणून तर एवढी खास असते. अशी भाजी न जमल्याने हिरमोड होतो पण परत कुठल्यातरी भंडाऱ्यात खायला मिळेल अशी स्वत:चे समजूत घालून घेतो. पण भंडाऱ्यातल्या बटाट्याच्या भाजीचं अर्थात भंडारा आलू भाजीचं रहस्य आम्हाला माहीती आहे. या भाजीचं रहस्य मसाल्यात नाही तर करण्याच्या विशिष्ट पध्दतीतही दडलेलं आहे. ते जाणून घेतलं तर अशी भाजी घरीही करणं सहज शक्य आहे.
Image: Google
कशी करावी भंडारा आलू भाजी?
भंडारा आलू भाजी करण्यासाठी 7-8 शिजवलेले बटाटे सालींसह, 1 मोठा टमाटा बारीक कापलेला, 1 इंच आल्याचा तुकडा बारीक कापून, 2-3 हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, 1 चमचा जिरे, 2 मोठे चमचे धणे पावडर, 1छोटा चमचा बडिशेप पावडर, अर्धा चमचा हळद, 2 चमचे काश्मिरी लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, 3 मोठे चमचे तेल, 1 चमचा आमचूर पावडर, 2 मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यावी.
Image: Google
भंडारा आलू भाजी करताना बटाटे शिजवून् घ्यावेत. मिक्सरमधून टमाटा, आलं, हिरवी मिरची एकत्र वाटून घ्यावी. कढईत तेल तापवून त्यात हिंग, जिरे फोडणीला घालावेत. जिरे तडतडले की मग त्यात टमाटा, आलं आणि मिरची पेस्ट घालावी. ही पेस्ट दोन मिनिटं मध्यम आचेवर परतून घ्यावी. पेस्ट परतल्यावर गॅस मंद आचेवर ठेवून त्यात धने पावडर, बडिशेप पावडर, हळद, काश्मिरी लाल तिखट आणि गरम मसाला एकामोगामाग घालून मसाला पेस्टमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यावा.
Image: Google
उकडलेल्या बटाट्याचे बोटांनी तुकडे करावेत. बटाट्याची सालं राहू द्यावीत. हे बटाटे फोडणीत घालून मसाल्यात चांगले मिसळून घ्यावेत. दोन कप पाणी चांगलं गरम करुन मग भाजीत घालावं. पाणी जास्त घालू नये. पाणी घालून भाजी हलवून घेतली मग भाजीत आमचूर पावडर घालावी. ती मिसळून घेतली की चवीपुरतं मीठ घालावं. भाजी हलवून घेतली की 3-4 मिनिटं मंद आचेवर उकळून घ्यावी. उकळल्यानंतर रस्सा खूपच घट्ट वाटला तर त्यात थोडं गरम पाणी घालावं. या भाजीच रस्सा जास्त घट्ट आणि जास्त पातळ करु नये. पुन्हा भाजी चांगली उकळली गेली की गॅस बंद करुन भाजीत चिरलेली कोथिंबीर घालावी. थोडा वेळ भाजी झाकून ठेवावी.
अशा प्रकारे बटाट्याची भाजी केली तर कोण तिला बटाट भाजी म्हणेल? अशा चविष्ट भाजीला भंडारा आलू भाजीच म्हटलं जाईल!