आपल्या भारतीय थाळीमध्ये जेवणासोबत तोंडी लावायला म्हणून काही खास पदार्थ असतात. तोंडी लावायला म्हणून असणाऱ्या या पदार्थांशिवाय भारतीय थाळी पूर्णच होऊ शकत नाही. जेवणासोबत तोंडी लावायला म्हणून आपण लोणचं, पापड, कुरडया, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, कोशिंबीर यांसारख्या इतर पदार्थांचा आस्वाद घेतो. तोंडी लावायला म्हणून घेतलेल्या या पदार्थांशिवाय आपले जेवणच पूर्ण होऊ शकत नाही. रोजच्या जेवणाची रंगत अजूनच वाढवण्यासाठी आपण काही पदार्थ आवर्जून ताटात वाढून घेतो.
आपल्या भारतीय जेवणात काही असे खास मसालेदार, चमचमीत पदार्थ असतात जे जेवणाच्या स्वादात आणखीनच भर पाडतात. आपल्याकडे वेगवेगळ्या भाज्यांमध्ये तऱ्हेतऱ्हेचे मसाले भरून ते स्टफ करून खाण्याची पद्धत आहे. यात भरलेली भेंडी, भरलेली वांगी, भरलेली ढोबळी मिरची अशा अनेक पदार्थांचा समावेश होतो. भरलेली मिरची हा त्यापैकीच एक पदार्थ आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांना बरोबर मधोमध चिरून त्यात चविष्ट मसाल्यांचे मिश्रण भरुन या भाज्यांना तेलात खरपूस भाजून मग त्यावर आवडीनुसार ताव मारला जातो. काहीवेळा हे पदार्थ तोंडी लावायला म्हणून देखील आवडीने खाल्ले जातात. भरली मिरची (Stuffed Chilli) हा खमंग पदार्थ आपण अनेकदा वरण भातासोबत तोंडी लावायला म्हणून घेतो. भावनगरी भरली मिरची घरच्या घरी कशी बनवायची त्याचे साहित्य व कृती पाहूयात(How To Make Bharli Mirchi At Home).
साहित्य :-
१. भाजून घेतलेले बेसन - ३ कप
२. हळद - १ टेबलस्पून
३. लाल तिखट मिरची पावडर - १ टेबलस्पून
४. बडीशेप पावडर - १ टेबलस्पून
५. गरम मसाला - १ टेबलस्पून
६. धणे पावडर - १ टेबलस्पून
७. मीठ - चवीनुसार
८. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेली )
९. तेल - २ ते ३ टेबलस्पून
१०. लिंबाचा रस - १ टेबलस्पून
११. पाणी - १ ते २ टेबलस्पून
१२. भावनगरी हिरव्या मिरच्या - ५ ते ६ (आकाराने मोठ्या)
१३. जिरे - १ टेबलस्पून
१४. हिंग - चिमूटभर
कृती :-
१. सर्वप्रथम हिरव्या मोठ्या आकाराच्या मिरच्या बरोबर मध्ये उभी चीर देऊन कापू घ्याव्यात.
२. या हिरव्या मिरच्या कापून घेतल्यानंतर चमच्याच्या मदतीने त्याच्या आतील बिया काढून घ्याव्यात. आत या मिरच्या बाजूला ठेवून द्याव्यात.
३. त्यानंतर एका भांड्यात तेल घेऊन त्यात जिरे, हिंग आणि बेसन घालून हे सगळे मिश्रण भाजून घ्यावे.
४. बेसन हलकेच भाजून त्याचा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावे.
५. आता हे भाजलेले बेसन एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावे.
रेस्टॉरण्टस्टाइल पण अजिबात तेलकट आणि वातड नसलेले कुरकुरीत स्प्रिंग रोल घरीच करण्याची सोपी रेसिपी...
नाश्त्याला करा पोटभरीची आणि चमचमीत ‘मसाला चपाती’, साध्या चपातीला खास मसाला ट्विस्ट....
६. त्यानंतर या भाजलेल्या बेसनमध्ये, हळद, लाल तिखट मिरची पावडर, बडीशेप पावडर, गरम मसाला, धणे पावडर, मीठ, कोथिंबीर, तेल, लिंबाचा रस घालून किंचित पाणी मिसळावे.
७. आता हा मसाला हातांनी एकत्रित मिसळून घ्यावा.
८. आता मिरचीच्या बरोबर मधोमध चीर करून घेतली त्या भागातून मिरचीच्या आत हा मसाला भरून घ्यावा.
९. आता एका पॅनमध्ये तेल घेईन त्यात या सगळ्या मिरच्या दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्याव्यात.
भरलेली मिरची खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम वरण भातासोबत ही भरलेली मिरची तोंडी लावायला म्हणून सर्व्ह करावी.