डाळ- तांदूळाची खिचडी आपण नेहमीच करतो. आठवड्यातून एक- दोनदा किंवा काही घरात तर यापेक्षाही जास्त वेळा रात्री खिचडीच केली जाते. थंडीच्या दिवसांत ज्वारीची खिचडी किंवा खिचडाही भरपूर खाल्ला जातो. आता यापेक्षाही हा एक एकदम वेगळा आणि नविन पदार्थ बघा.. खिचडीच आहे ही पण फक्त गव्हाची (gehu khichadi). गहू आणि डाळ घालून केलेल्या या खिचडीला बिकानेही खिचडी म्हणून ओळखलं जातं.. ही खिचडी म्हणजे राजस्थानची स्पेशल खिचडी असून डायबेटीज झालेल्या लोकांसाठीही ती फायदेशीर ठरते.
सकाळी नाश्ता म्हणून किंवा रात्रीसाठी वन डिश मील म्हणून पाहिजे असेल तरी तुम्ही ही खिचडी खाऊ शकता. आपल्या तांदळाच्या खिचडीला हा एक मस्त पर्याय आहे.. त्यामुळे चवीमध्ये बदल म्हणून, तेच ते खाण्याचा कंटाळा आला असेल तर थोडा चेंज म्हणून ही खिचडी नक्की करून बघा.. कुडकुडत्या थंडीत वाफाळती बिकानेरी खाण्याची मजा काही औरच..
बिकानेरी खिचडी करण्यासाठी लागणारे साहित्य
अर्धा कप गहू, पाऊण कप मुगाची डाळ, एका हिरव्या मिरचीचे तुकडे, १ लाल सुकी मिरची, अर्धा टी स्पून जीरे, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून हळद, चुटकीभर हिंग, तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर.
कशी करायची बिकानेरी खिचडी
How to make Bikaneri khichadi?
- ही खिचडी करण्यासाठी गहू ८ ते १० तास पाण्यात भिजत ठेवा.
- पाण्यात भिजून मऊ झालेल्या आणि भिजलेल्या गव्हाची मिक्सरमधून जाडीभरडी पेस्ट करून घ्या.
- मुगाची डाळ देखील एखादा तास पाण्यात भिजत टाका.
- यानंतर कुकरमध्ये गहू, डाळ टाका. जेवढी गहू आणि डाळ असेल त्याच्या दुप्पट पाणी टाका. हळद आणि चवीनुसार मीठ टाका आणि गहू- डाळ शिजवून घ्या.
- तीन- चार शिट्ट्यांमध्येच छान मऊ खिचडी तयार होईल.
- आता या खिचडीला वरतून जीरे, लाल मिरची, हिरवी मिरची, कढीपत्ता असं टाकून वरतून फोडणी करून घ्या.
- थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरली की झाली झकास चवीची बिकानेरी गहू खिचडी तयार...