Join us  

कडू कारलं आवडत नाही? कारल्याची चटणी करा, नावडतं कारलंही होईल खूप आवडतं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 10:04 AM

कारलं म्हटल्याबरोबर तोंडाला पाणी सुटेल असा पर्याय शोधत असाल तर कारल्याची चटणी (bitter gourd chutney) करुन बघा. कडू कारल्याची आवड निर्माण होण्यासाठी कारल्याचा चटणी अवश्य करुन पाहावी.

ठळक मुद्देपहिल्या प्रकारे कारल्याची चटणी करताना कारल्याचा कडूपणा जाण्यासाठी कारले मिठाच्या पाण्यातून दोनदा तिनदा धुवून घ्यावेत. कारल्याची चटणी करण्यासाठी जास्त प्रमाणात तेल घेऊ नये. फीचर इमेज: madhurasrecipe.com

कारल्याचं नाव काढलं तर न खाताही तोंड कडू होतं. पण आरोग्यासाठी कधी मधी खावी भाजी म्हणून केली तर ती उठतच नाही अशी अनेकींची तक्रार. जिथे मोठ्यांनाच कारलं आवडत नाही तिथे लहान मुलांना कुठे आवडेल कारलं ? कारलं कडू असल्यामुळे आवडत नाही असं असलं तरी आपण कारल्याची भाजी कशी करतो यावरही कारलं आवडेल की नाही हे अवलंबून असतं. कारलं म्हटल्याबरोबर तोंडाला पाणी सुटेल असा पर्याय शोधत असाल तर कारल्याची चटणी (bitter gourd chutney)  करुन बघा.. वेगवेगळ्या प्रकारे कारल्याची भाजी केली जाते. पण कारल्याची चटणी हा नवीन प्रकार वाटेल. पण जेवणात चव आणणारी ही कारल्याची चटणी काही घरात होते. कारल्याची चटणी करणं  (how to make bitter gourd chutney) हे तसं अवघड काम नाही. कडू कारल्याची आवड निर्माण होण्यासाठी कारल्याचा चटणी अवश्य करुन पाहावी. कारल्याची चटणी दोन प्रकारे ( two types of bitter gourd chutney)  करता येते. 

Image: Google

प्रकार 1कारल्याची चटणी करण्यासाठी 3 छोटे कारले, 1 चमचा तेल, 1 चमचा जिरे, पाव चमचा हिंग, 2 चमचा शेंगदाण्याचं कूट, 1 चमचा तीळ, पाव चमचा हळद, दीड चमचा लाल तिखट, 2 चमचे साखर, 2 चमचे लिंबाचा रस, चवीनुसार मीठ,  आणि अर्धा चमचा चाट मसाला घ्यावा. कारल्याची चटणी करताना सर्वात  आधी कारले स्वच्छ धुवून पुसून घ्यावेत. कारल्याचे दोन भाग करावेत. कारल्यातल्या बिया काढून टाकाव्यात. नंतर कारले किसून घ्यावेत. 3 छोटे कारले चिरले की 1 कप कारल्याचा कीस होतो. नंतर एका भांड्यात कारल्याचा कीस, त्यात मीठ आणि पाणी घालावं. मिठाच्या पाण्यातून कारल्याचा कीस धुवून बाजूला ठेवावा. गॅसवर कढई गरम करण्यास ठेवावी. त्यात 1 चमचा तेल घालावं . तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, पाव चमचा हिंग घालावा. फोडणीत कारल्याचा कीस घालावा. मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटं कारल्याची कीस शिजू द्यावा.  यात 2 चमचे दाण्याचं कूट, अर्धा कप खोवलेलं खोबरं, 1 चमचा तीळ, पाव चमचा हळद आणि लाल तिखट घालून पाच मिनिटं मिश्रण हलवून घ्यावं. नंतर त्यात साखर, लिंबाचा रस, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालावं. सर्व नीट हलवून घेतलं की कारल्याची चटणी तयार होते. 

Image: Google

प्रकार 2 

दुसऱ्या पध्दतीनं कारल्याची चटणी करताना 2 मध्यम आकाराचे कारले, पाव चमचा मीठ,  2 मोठे चमचे तेल, पाव चमचा हिरव्या मिरच्यांचं वाटण, अर्धा चमचा लसणाची पेस्ट, 1 मोठा चमचा तीळ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर आणि  पाव कप गूळ घ्यावा. कारल्याची कोरडी चटणी करताना कारले धुवून पुसून  घ्यावेत. कारल्याचे दोन भाग करुन त्यातील बिया काढून टाकाव्यात. कारले किसून घ्यावेत. किसलेल्या कारल्याला मीठ लावून ठेवावं.  20 मिनिटानंतर कारल्याला सुटलेलं पाणी पिळून घ्यावं. कढईत  तेल घ्यावं. तेल गरम झालं की त्यात कारल्याचा कीस घालावा. मंद आचेवर तो परतून घ्यावा. कारल्यातलं पाणी पूर्णपणे उडून गेलं की त्यात पाव चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, अर्धा चमचा लसणाची पेस्ट, तील, हळद आणि धणे पावडर घालून मिश्रण चांगलं परतून घ्यावं. सर्वात शेवटी चटणीत गूळ घालून तो चटणीत नीट मिसळला जाईपर्यंत चटणी परतावी. चटणीत गूळ मिसळला गेला की गॅस बंद करुन चटणी थंड होवू द्यावी.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सपाककृती