उन्हाळा असो किंवा हिवाळा कढी (Boondi Kadhi) आवर्जून खाल्ली जाते. कढी अनेक प्रकारची केली जाते. काही ठिकाणी खानदेशी लसुणी कढी केली जाते, तर काही ठिकाणी भजी - ताकाची कढी केली जाते. पण याहून हटके कढीचा प्रकार आपल्याला खायचा असेल तर, एकदा ढाबास्टाईल बुंदीची कढी करून पाहा. एरव्ही आपण जेवणात महाराष्ट्रीयन कढी बनवतोच.
रोजच्या जेवणात तेच आमटी, वरण, उसळ खाऊन कंटाळा आला असेल तर, एकदा बुंदी कढी ही रेसिपी करून पाहाच. बुंदीचे लाडू, तिखट बुंदी आपण खातोच, पण याचा वापर आता कढीमध्ये करून पाहा. परफेक्ट पातळ न होता, दाट ढाबास्टाईल कढीची कशी तयार करायची पाहूयात. हिवाळ्यात आपल्याला या कढीचा प्रकार नक्कीच आवडेल(How to Make Boondi Kadhi Recipe).
ढाबास्टाईल बुंदीची कढी करण्यासाठी लागणारं साहित्य
हिरवी मिरची
लसूण
आलं
दही
बेसन
तेल
मोहरी
जिरं
मेथी दाणे
दालचिनी
हिंग
कडीपत्ता
कांद्याची पात
मार्गशीर्ष गुरुवार उपवास स्पेशल : करा मेथीचे वरण, उपवास सोडताना जेवणात हवेच चमचमीत वरण - पाहा रेसिपी
मीठ
धणे पूड
जिरे पूड
लाल तिखट
हळद
कृती
सर्वप्रथम, खलबत्त्यात २ ते ३ हिरव्या मिरच्या, आलं, लसूण घालून ठेचून घ्या. तयार ठेचा एका बाऊलमध्ये काढून घ्या. एका मोठ्या बाऊलमध्ये ४ ते ५ चमचे दही घ्या. नंतर त्यात कपभर बेसन घालून व्हिस्करने फेटून घ्या. फेटून घेतल्यानंतर त्यात एक ग्लास पाणी घालून मिक्स करा. दुसरीकडे कढईत ३ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, एक चमचा जिरं, अर्धा चमचा मेथी दाणे, दालचिनीचा एक तुकडा, चिमुटभर हिंग, कडीपत्ता आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालून परतवून घ्या.
नंतर त्यात एक छोटा बाऊल बारीक चिरलेली कांद्याची पात घाला. कांदा परतवून झाल्यानंतर त्यात बेसन-दह्याचा बॅटर, चिमुटभर मीठ, धणे-जिरे पूड, एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घालून मिक्स करा. कढीला उकळी आल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. नंतर त्यात कपभर प्लेन बुंदी घालून गॅस बंद करा. अशाप्रकारे बुंदीची कढी खाण्यासाठी रेडी. आपण ही कढी गरम भात, चपाती किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता.