Join us  

सणावाराला गोडाधोडाच्या पदार्थांत वेलची पावडर हवीच; विकत आणण्यापेक्षा २ प्रकारे घरीच करा झटपट वेलची पूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2022 3:49 PM

गोडाच्या पदार्थांना जो स्वाद घरी तयार केलेल्या वेलची पूडनं (cardamom powder) येतो तो विकतच्या वेलची पूडनं येत नाही. घरी देखील विकतच्यासारखी ( homemade cardamom powder) अतिशय बारीक दळलेली वेलची पूड करता येते. घरच्याघरी वेलचीपूड करण्याच्या (how to make cardamom powder at home) दोन पध्दती आहेत. 

ठळक मुद्देवेलची मिक्सरमधून बारीक करण्याआधी दोन दिवस ऊन दाखवून हडकून घ्यावी. वेलची पूड करताना ती शक्यतो वेलचीच्या फोलपटासह करावी. वेलची बारीक वाटली जावी यासाठी वाटताना थोडी साखर घालावी. 

सणवार सुरु झाले की घरात नैवेद्याला गोडाधोडाचे पदार्थ केले जातातच. गोडाच्या पदार्थांमध्ये सगळं घातलं आणि चिमूटभर वेलची पूडच (cardamom powder)  घातली नाही तर पदार्थाला चवच येत नाही. मग तो प्रसादाचा शिरा असो, खीर असो ,गुलाबजाम, श्रीखंड असं काहीही असो. गोडाच्या पदार्थात स्वादासाठी वेलची पूड आवश्यकच असते. अनेकदा वेलची पूड बाहेरुनच विकत आणली जाते. बारीक पिठीसारखी दळलेली वेलची पूड हवी असते. ती घरी होत नाही असा अनेकींचा अनुभव. घरी वेलची पूड करताना  (homemade cardamom powder) वेलचीचे दाणे नीट दळलेच जात नाही. म्हणून मग महागडी वेलची पूडचं छोटंसं पाकिट विकत आणलं जातं. पण गोडाच्या पदार्थांना जो स्वाद घरी तयार केलेल्या वेलची पूडनं येतो तो विकतच्या वेलची पूडनं येत नाही. घरी देखील विकतच्यासारखी अतिशय बारीक दळलेली वेलची पूड (how to make cardamom powder at home)  करता येते. घरच्याघरी वेलचीपूड करण्याच्या दोन पध्दती आहेत. 

Image: Google

पध्दत पहिली

वेलची पूड तयार करण्यासाठी 250 ग्रॅन वेलचा आणावी. वेलची पूड करण्याआधी वेलची 1-2 दिवस उन्हात ठेवावी. उन्हात ठेवल्यानं वेलचीचा वातडपणा कमी होतो.  कढईत अर्धा चमचा तूप घालून ते गरम करावं. गरम तुपात वेलची परतून घ्यावी. गॅस बंद करुन वेलची गार होवू द्यावी. नंतर वेलची मिक्सरमधून बारीक वाटावी. ती मिक्सरमधून बारीक वाटली जावी यासाठी त्यात 1 चमचा साखर घालावी. साखरेमुळे वेलची बारीक वाटली जाते. वेलचीचे फोलपट न काढता वेलची दळावी. वेलचीच्या फोलपटालाही चांगला स्वाद असतो . यामुळे वेलची पूडही जास्त होते, आधी ऊन दाखवून आणि नंतर परतून घेतल्यानं फोलपटासह वेलची मिक्सरमध्ये फिरवली तरी बारीक दळली जाते.  

Image: Google

दुसरी पध्दत

दुसऱ्या पध्दतीनं वेलची पावडर तयार करतानाही वेलची 1 ते 2 दिवस उन्हात ठेवावी. वेलची हडकली की मग ती न भाजताच थोडी साखर घालून वाटावी. वेलची पावडर करताना एखादं जायफळ फोडून त्यात घातल्यास वेलची पूडला चांगला स्वाद येतो. वेलची पूड बारीक दळली जाते. या पध्दतीनं वेलची पूड करताना मिक्सरमध्ये दळली की ती पिठाच्या चाळणीनं चाळून घ्यावी. खरबरीत वेलची पुन्हा वाटावी आणि चाळणीतून गाळावी. असं दोन तीनदा केल्यानंतर शेवटी अगदी न वाटली गेलेली वेलची शिल्लक राहाते. ती वेलची केवळ फोलपट आहे म्हणून फेकून न देता चहाच्या पावडरमध्ये मिक्स करुन ठेवल्यास चहाला छान स्वाद येतो. 

Image: Google

घरी तयार केलेली वेलची पूड काचेच्या छोट्या बरणीत भरावी. वेलची पूड वापरताना त्यात ओलसर चमचा घालू नये. वेलची पूड वापरल्यानंतर बरणीचं झाकण नीट लावून ठेवावं. अशाच पध्दतीनं तिखट पदार्थांमध्ये वापरण्यासाठी मोठ्या वेलदोड्यांचीही पूड तयार करता येते.    

टॅग्स :अन्नपाककृतीकिचन टिप्स