लालेलाल, लांबसडक गाजर हे हिवाळ्याच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक... एरवी सिझन नसताना हायब्रिड गाजरं वर्षभर मिळतात, हा भाग वेगळा.. पण खास हिवाळ्यात येणाऱ्या गाजरांचं सुख निराळंच.. म्हणूनच तर हिवाळ्यात गाजराचा हलवा, गाजराची कोशिंबीर, गाजराचा केक असे अनेक वेगवेगळे पदार्थ केले जातात.. हा देखील त्यातलाच एक पदार्थ. गाजर- बदाम मिल्क.. खास Winter special drink.... शरीर उबदार ठेवणारं आणि भरपूर एनर्जी देऊन वेटलॉससाठी (weight loss) फायदेशीर ठरणारं हे पेय एकदा तरी पिऊन बघायलाच हवं..
काही दिवसांपुर्वीच सोशल मिडियावर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची एक पोस्ट व्हायरल झाली होती. यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की हिवाळ्यात गाजराचा हलवा खाऊन खाऊन आता वजन वाढू लागलं आहे.. त्यांचंच नाही, तर बऱ्याच लोकांचं हेच मत आहे. हलवा खाण्याचा मोह आवरत नाही, पण त्यामुळे मग वजनाचा पारा मात्र भराभर वाढू लागतो.. त्यामुळेच तर गाजराच्या हलव्याऐवजी हे दूध पिऊन बघा.. गाजराच्या हलव्याप्रमाचेच या दुधाची चव लागते, असं काही जणांचे मत आहे. हे दूध करण्यासाठी आपण गाजर, बदाम, गूळ, खजूर हे पदार्थ वापरणार असल्याने, ते निश्चितच भरपूर पोषक आहे... गाजर- बदाम मिल्कची ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या aartimadan या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
गाजर- बदाम मिल्क करण्यासाठी लागणारं साहित्य
१. दोन गाजर, ७ ते ८ खजूर, २ टेबलस्पून गुळ, १०- १२ बदाम, २ कप दूध, थोडीशी विलायची.
कसं करायचं गाजर- बदाम मिल्क
How to make gajar badam milk
- हे दूध करण्यासाठी सगळ्यात आधी खजूर पाण्यात भिजत ठेवा. खजूर ४ ते ५ तास तरी पाण्यात भिजले पाहिजेत. तसेच बदाम देखील पाण्यात भिजत ठेवा. बदाम सुद्धा ७ ते ८ तास पाण्यात भिजले पाहिजेत. बदामाची सालं काढून घ्या.
- गाजराच्या बारीक फोडी करा. या फोडी मिक्सरमध्ये टाका. त्यात भिजवलेले काजू पाण्यासकट टाकून द्या. भिजवलेले बदामही टाका. या तिन्ही गोष्टी मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट करून घ्या.
- आता एक पातेले गॅसवर तापत ठेवा. त्यात मिक्सरमधून बारीक केलेले वाटण टाका. त्यात दूध घाला.
- सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. दुधाला उकळू द्या. दूधाला एक उकळी आली की त्यात विलायची पावडर घाला. जसे दूध उकळेल तसा त्याचा रंग बदलत जाईल.
- पुन्हा दूध उकळू द्या. आपल्याला दूध थोडे घट्ट होईपर्यंत उकळू द्यायचे आहे. त्यामुळे ते थोडे आटेपर्यंत उकळवा. यानंतर गॅस बंद करा आणि त्या दूधात गूळ टाका. त्यानंतर पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. आता हे दूध ग्लासमध्ये सर्व्ह करा. वरतून बदामाचे काप टाकून त्याला डेकोरेट करा... मस्त थंड- थंड गारव्यात गरमागरम गाजर- बदाम मिल्क पिण्याचा आनंद घ्या..