How to make Carrot kheer: गाजर बाजारात बाराही महिने मिळत असले तरी लालचुटूक, चवीला गोड अशा गाजराचा सिझन म्हणजे हिवाळा. एरवी उपलब्ध असलेल्या गाजरांना चव, गुण आणि रुपाच्या बाबतीत हिवाळ्यातल्या गाजरांची सर नसते. म्हणूनच हिवाळ्यातल्या गाजरांची पौष्टिकता आणि गोडवा अनुभवण्यासाठी गाजराचा हलवा केला जातो. पण गाजराच्या हलव्या इतकीच गाजराची खीरही पौष्टिक होते. गाजराची खीर आरोग्यासाठी चवीनं खाण्याचं गोडाचा प्रकार आहे. आपलं आरोग्य जपण्यासाठी ही खीर खायला विशेष महत्त्व आहे. तसेच अचानक आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचारही गाजराच्या खिरीनं उत्तम होतो.
Image: Google
गाजराची खीर खाल्ल्याने शरीरास अ, बिटा केरोटीन, क, के जीवनसत्त्वं, पोटॅशियम हे खनिज मिळतं. ही खीर खाल्यानं चवीची हौस जशी भागवली जाते तशीच आरोग्याची पौष्टिकतेची गरजही गाजराची खीर खाल्ल्याने भागवली जाते. गाजराची खीर खाल्ल्याने कॅन्सरचा धोका, हदयविकाराचा धोका टळतो. मौखिक आरोग्य चांगलं राहातं. गाजराची खीर खाल्ल्याने शरीरास ऊर्जा मिळते, रोगप्रतिकारशक्ती वाढते. चविष्ट, गुणसंपन्न, मलईदार लागणारी गाजराची खीर खाल्ल्यानं पचनक्रिया सुधारते, आतड्यांचं आरोग्य चांगलं राहातं. ॲण्टिसेप्टिक, रेचक या गुणधर्माची गाजराची खीर पोटाचं आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम असते.
Image: Google
गाजराची खीर कशी करावी?
गाजराची खीर करण्यासाठी अर्धा किलो गाजर, चवीनुसार साखर, बेदाणे, काजू, बदाम, वेलची आणि जायफळ पूड, चारोळी, 125 ग्रॅम खवा , 1 लिटर दूध, केशर काड्या आणि साजूक तूप घ्यावं.
गाजराची खीर करण्यासाठी आधी गाजरं धूवून, सालं काढून किसून घ्यावीत. कढईत 2 मोठे चमचे तूप घ्यावं. तुपात आधी काजू परतून घ्यावेत. नंतर उरलेल्या तुपात गाजराचा कीस परतून घ्यावा. बदामाचे पातळ काप करुन घ्यावेत. खिरीचा पोत मऊ मुलायम होण्यासाठी परतून घेतलेल्या काजू सोबतच परतलेला गाजराचा कीस मिक्सरमधून वाटून घ्यावा. कढईत दूध घालून दुधाला उकळी आणावी. दूध उकळून आटायला लागलं की त्यात परतलेला गाजराचा कीस किंवा गाजर- काजूची पेस्ट घालावी.
Image: Google
मंद आचेवर मिश्रण चांगलं उकळू द्यावं. मधून मधून ते हलवत राहावं. नंतर मिश्रणात साखर घालावी. साखर विरघळली की त्यात वेलची जायफळ पूड घालावी. चारोळी घालावी. बदामाचे काप घालावेत. खीर चांगली हलवून घ्यावी. गॅस बंद करावा. ही खीर गरमपेक्षा गार छान लागते. खीर सामान्य तापमानाला आली की ती फ्रिजमध्ये ठेवून गार करावी. गार झाल्यावर गाजराची खीर बासुंदीसारखी लागते.
Image: Google
खीर आणखी घट्ट होण्यासाठी उकळत्या दुधात परतलेल्या गाजराचा कीस किंवा गाजराचं वाटलेलं मिश्रण घातल्यानंतर त्यात थोडा भिजवलेला साबुदाणा घालावा. खीर बासुंदीसारखी चविष्ट आणि खमंग होण्यासाठी थोडा खवा भाजून तो खिरीला लावावा. गाजर, दूध, खवा आणि सुकामेवा यामुळे गाजराच्या खिरीला पौष्टिक खीर म्हणून ओळखलं जातं.
हिवाळा संपण्याआधी ही गुण संपन्न आणि चविष्ट लागणारी खीर नक्की करुन पाहा!