Join us  

रव्याच्या शिरा नेहमीचा, करा हरभऱ्याच्या डाळीचा शिरा! बाप्पासाठी खमंग नैवेद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2022 8:07 AM

रव्याचा शिरा, मुगाच्या डाळीचा हलवा नेहमीचाच. शिऱ्याचा नवीन प्रकार करायचा असल्यास हरभरा डाळीचा (chana dal halwa) शिरा करुन पाहायला हवा. 

ठळक मुद्देहरभऱ्याच्या डाळीचा शिरा अथवा हलवा करण्यासाठी फारशी पूर्वतयारी करावी लागत नाही. पण शिरा दुसऱ्या दिवशी करण्यासाठी आदल्या दिवशी हरभरा डाळ भिजत घालणं गरजेचं असतं.शिरा मंद आचेवरच भाजायला हवा. 

नैवेद्यासाठी झटपट एखादा पदार्थ करायचा म्हटलं की रव्याचा शिरा केला जातो. पण सारखा रव्याचा शिरा खाऊनही कंटाळा येतो. मुगाच्या डाळीचा शिराही अनेक वेळा नैवेद्याला केलेला असतोच. शिराच पण जरा वेगळ्या प्रकारचा असा काही विचार करत असाल तर हरभऱ्याच्या डाळीचा शिरा (chana dal halwa)  करुन पाहायला हवा. खमंग चवीचा शिरा बाप्पाच्या नैवेद्याला वेगळा पदार्थ म्हणून करत येईल. हरभऱ्याच्या डाळीचा शिरा अथवा हलवा करण्यासाठी (how to make chana dal halwa)  फारशी पूर्वतयारी करावी लागत नाही. पण शिरा दुसऱ्या दिवशी करण्यासाठी आदल्या दिवशी हरभरा डाळ भिजत घालणं गरजेचं असतं. 

Image: Google

कसा करायचा हरभरा डाळीचा शिरा?

हरभरा डाळीचा शिरा करण्यासाठी 1 कप हरभरा डाळ, 1 कप दूध, 1 कप साजूक तूप, 1 कप साखर, 5-6 बदाम आणि  5-6 काजू घ्यावेत. हरभरा डाळीचा शिरा करण्यासाठी सर्वात आधी डाळ धुवून रात्रभर भिजवावी. सकाळी डाळ उपसून ठेवावी. डाळीतलं पाणी पूर्णपणे निथळून जायला हवं.  पाणी पूर्णपणे निथळलं गेलं की डाळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावी. कढई गॅसवर गरम करायला ठेवावी. कढईत तूप घालावं. तूप गरम झालं की वाटलेली हरभरा डाळ घालून मिश्रण भाजण्यास सुरुवात करावी. शिरा भाजताना गॅसची आच मंद असावी. मिश्रण सतत हलवत राहावं. मिश्रणाला सोनेरी रंग येईपर्यंत ते भाजावं.

Image: Google

मिश्रण भाजत आलं की गॅसवर दूध गरम करायला ठेवावं. दूध गरम होवून दुधाला उकळी फुटायला हवी. दूध भाजलेल्या डाळीच्या मिश्रणात हळूहळू ओतावं. दूध घातल्यानंतर मिश्रण सतत हलवत राहावं. मिश्रणात दूध पूरणपणे शोषलं जायला हवं. मिश्रणातलं दूध आटलं की त्यात साखर आणि वेलची पूड घालून मिश्रण पुन्हा थोडा वेळ परतावं. मिश्रण परताना हाताला हलकं लागायला लागलं, ते थोडं पातळ झालेलं दिसलं आणि कढईच्या कडा सोडताना दिसलं की शिरा चांगला भाजला गेला आहे असं समजावं. गॅस बंद करुन शिऱ्यावर बदामाचे, काजूचे तुकडे पेरावेत. हरभरा डाळीचा खमंग चवीचा हा शिऱ्याचा नवीन प्रकार यंदाच्या गणेशोत्सवात नैवेद्याला अवश्य करुन पाहावा!

टॅग्स :गणेशोत्सवअन्नपाककृती