Join us  

घरच्या घरी १५ मिनीटांत तयार होईल चना जोर गरम, घ्या सोपी, चटपटीत रेसिपी..खा हेल्दी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2023 3:53 PM

How To Make Chana Jor Garam at Home : पोटभरीचा आणि तरीही अतिशय हेल्दी असलेला हा हटके पदार्थ झटपट कसा करायचा

ठळक मुद्देचना जोर गरम विकत कशाला घ्यायचं..घरच्या घरी करता येणारी सोपी रेसिपी..चहासोबत, स्नॅक्स म्हणून खाता येईल असा उत्तम पर्याय...

आपण बागेत किंवा कुठे फिरायला गेलो की आपण आवर्जून खातो अशा गोष्टी म्हणजे खारे दाणे, सुकी भेळ, चना जोर गरम. आता चना जोर गरम हा असा पदार्थ आहे की तो चटपटीत असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. चण्याचे असल्याने आरोग्यासाठी हेल्दी आणि तितकाच चविष्ट असणारा हा पदार्थ संध्याकाळी स्नॅक्सच्या वेळेला खायला फारच छान वाटतो. यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, कैरी, शेव असं काही असेल तर याची लज्जत आणखीनच वाढते (How To Make Chana Jor Garam at Home). 

ठेल्यावर मिळणारा हा पदार्थ आपण अगदी झटपट घरीही तयार करु शकतो. अनेकदा चना जोर गरम मशीनवर केले जाते की काय असा प्रश्न आपल्याला पडतो. पण अगदी सोप्या पद्धतीने हातानेही आपण हा चटपटीत पदार्थ काही मिनीटांत तयार करु शकतो. प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया ठेल्यावर मिळणारे हे चना जोर गरम घरी कसे तयार करायचे ते सांगातात. पाहूया पोटभरीचा आणि तरीही अतिशय हेल्दी असलेला हा हटके पदार्थ झटपट कसा करायचा...

(Image : Google)

साहित्य -

१. चणे - २ वाटी 

२. तेल - २ वाट्या 

३. तिखट - अर्धा चमचा 

४. मीठ - अर्धा चमचा 

५. चाट मसाल किंवा आमचूर पावडर - अर्धा चमचा 

कृती -

१. चणे म्हणजेच हरभरा रात्रभर किंवा ७ ते ८ तास पाण्यात भिजत घालायचे.

२. सकाळी कुकरमध्ये ३ ते ४ शिट्ट्या घेऊन उकडायचे. 

३. बाहेर काढून पाणी काढून टाकायचे आणि बत्ता किंवा वाटीने ते दाबायचे म्हणजे ते चपटे होतात.

४. हे दाबलेले चणे तेलात घालून तळून काढायचे.

५. गरम असतानाच त्यावर तिखट, मीठ आणि चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालायचे. 

६. यावर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, काकडी, कैरी, शेव असं आपल्याला आवडेल ते घालून भेळीसारखं खायचं. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.