पोळी हा आपल्या आहारातील एक मुख्य घटक. पण कोणाला पोळ्यांसाठी वेळ लागतो, तर कोणाला कितीही काही केले तरी मऊ, लुसलुशीत पोळ्या येतच नाहीत. आता यासाठी काय करावे असा प्रश्नही नव्याने स्वयंपाकाला लागलेल्या अनेकींना पडतो. मग कधी आईला विचारुन तर कधी आणखी काही टिप्स वापरुन आपण पोळ्या मऊ करण्याचा प्रयत्न करतो. (How to Make Chapati Roti Soft) पण तो यशस्वी होतोच असे नाही. पोळ्या धड नसतील तर मात्र सगळ्या जेवणाचीच चव जाते. मग आपण खायचे म्हणून खातो आणि जेवण उरकतो. पण आवडीने मनापासून जेवण करायचे असेल तर पोळ्या मऊ आणि लुसलुशीत असायला हव्यात. अनेकजण घाईच्या वेळात सकाळचा नाश्ता म्हणूनही गरम पोळीच खातात (Tips by Pankaj Bhadouria).
पोळी कधी वातट होते तर कधी कडक. कणीक मळताना जास्त तेल घातले की पोळी चांगली होते किंवा कणीक सैल भिजवली की पोळी चांगली होते असा आपला समज असतो. पण दरवेळी असेच असते असे नाही. मुख्यत: पोळ्या मऊ होण्यासाठी अनेक घटक गरजेचे असतात. गव्हाचा दर्जा, दळण, पीठ मळणे, पोळी एकसारखी लाटली जाणे आणि मग ती योग्य पद्धतीने भाजणे या सगळ्या क्रिया योग्य झाल्या तर पोळी मऊ आणि लुसलुशीत होते. अशी पोळी तुम्ही डब्यात नेली आणि ती गार झाल्यावर खाल्ली तरीही ती मऊच लागते. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया पोळी मऊ होण्यासाठी एक अतिशय साधी आणि सोपी ट्रीक सांगतात.
काय आहे सोपी ट्रीक...
सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या पंकज यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये त्यांनी कणीक मळताना काय करायचे याची सोपी ट्रीक सांगितली आहे. कणीक मळताना त्यामध्ये आपण मीठ, थोडं तेल आणि पाणी घालतो. पण हे पाणी साधारणपणे आपण गार घेतो. तर कणीक मळताना गार पाण्यापेक्षा थोडं कोमट पाणी घेतलं तर ती कणीक मिळून यायला सोपं होतं. कणीक मळल्यानंतर ती १५ मिनीटे झाकून ठेऊन द्यायची. त्यानंतर ती अगदी मऊ होते, मग पोळ्या लाटल्या तर त्या लुसलुशीत तर होतातच, पण टम्म फुगतातही. इतकंच नाही तर या पोळ्या डब्यात नेल्या किंवा अगदी सकाळच्या रात्री खाल्ल्या तरी मऊसूत राहतात. एखादी गोष्ट सांगण्याची पंकज यांची पद्धत अतिशय छान असल्याने त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. एका दिवसांत त्यांचा पोळीचा हा व्हिडिओ ११ हजार जणांनी पाहिला आहे.