छठ पूजेला विशेष महत्त्व आहे. ही पूजा दरवर्षी दोन दिवस चालते. छट पूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे. छटव्रत स्वीकारून ही पूजा करण्यात येते. या व्रतादरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात व सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडण्यात येतो. भारताच्या बिहार आणि झारखंड या राज्यात हे व्रत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येते. या सणानिमित्त ठेकुआ हा पदार्थ छटपूजेचा प्रसाद म्हणून केला जातो. बिहार आणि झारखंड मधली हि पारंपरिक रेसिपी आहे. हा पदार्थ खूप दिवस टिकतो आणि सहज म्हणून चहाबरोबर खायला पण छान लागतो. कधी कधी ठेकुआ मऊ होते. ज्यामुळे चवीत फरक पडतो. जर तुम्हाला ठेकुआ कुरकुरीत बनवायचे असेल तर ही पद्धत फॉलो करा. यामुळे ठेकुआ स्वादिष्ट आणि कुरकुरीत बनतील. चला तर मग जाणून घेऊया ठेकुआ बनवण्याची रेसिपी.
ठेकुआ बनवण्यासाठी लागणारे साहित्य
250 ग्रॅम गव्हाचे पीठ
एक चमचा देशी तूप
सुक्या खोबऱ्याची पूड
गूळ
वेलची पूड
तळण्यासाठी तेल
बारीक चिरलेला सुका मेवा
व्हॅनिला एसेन्स
कृती
ठेकुआ बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात पाणी गरम करा. नंतर या गरम पाण्यात गूळ टाका. पूर्ण गूळ वितळल्यावर हे पाणी गाळून घ्या. नंतर ते गुळाचं पाणी थंड होण्यासाठी ठेवा. आता एका मोठ्या प्लेटमध्ये गव्हाचे पीठ घ्या. नंतर त्यात कोरड्या खोबऱ्याची पूड घाला. बारीक चिरून घेतलेले ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर घाला. जर तुम्हाला व्हॅनिला एसेन्सचा सुगंध हवा असेल तर तुम्ही दोन थेंब टाकू शकता.
आता हे पीठ मिक्स करून गुळाच्या पाण्याच्या मदतीने मळून घ्या. पीठ खूप घट्ट मळून घ्यावे. जेणेकरून ठेकुआ कुरकुरीत होतील. पीठ मळून झाल्यावर त्याचे छोटे गोळे तयार करा. त्यानंतर कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात ठेकुआ तळून घ्या. साच्याच्या मदतीने ठेकुआला इच्छित आकार द्या. शेवटी मंद आचेवर सोनेरी रंग येवूपर्यंत ठेकुआ तळून घ्या. अश्याप्रकारे कुरकुरीत आणि खुसखुशीत ठेकुआ तयार आहेत, आपण ठेकुआंना हवाबंद डब्यात भरून ठेऊ शकता आणि अनेक दिवस आरामात खाऊ शकता.