रस्त्याच्या कडेला, जुहू चौपाटीवर, गार्डनजवळ बरेच चाटचे ठेले असतात. या ठेल्यांवर मिळणारे चटपटीत चाट खाणे म्हणजे स्वर्ग सुखच म्हणावे लागेल. भेळ, पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी, रगडा पॅटिस, मसाला पॅटिस, पापडी चाट असे तोंडाला पाणी आणणारे चाटचे प्रकार सगळेच ताव मारून खातात. खरतर, या चाटचे प्रकार चविष्टय बनविण्यासाठी त्यात योग्य प्रमाणात तिखट, गोड, आंबट चटण्या घालाव्या लागतात. या विविध चवीच्या चटण्यांमुळेच चाट चटकदार, लज्जतदार बनवता येते. संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळी आपण घरी झटपट बनवता येईल अशी सुकी भेळ तयार करतो. परंतु घरी बनवलेल्या सुक्या भेळीला चाटच्या ठेल्यांवर मिळणाऱ्या भेळेसारखी चव येत नाही. अश्यावेळी या भेळेला परफेक्ट ठेला स्टाईल भेळ तयार करण्यासाठी त्यात एक सिक्रेट पावडर घालावी लागेल. यामुळे आपली सुकी भेळ परफेक्ट ठेला स्टाईल होऊन अधिक चटकदार लागेल. काय आहे ती सिक्रेट रेसिपी पाहूयात(How To Make Chutney Powder For Sukha Bhel : Chaat Recipes).
साहित्य :-
१. कोथिंबीर - १/२ कप २. हिरव्या मिरच्या - ३ (बारीक चिरून घेतलेल्या)३. पुदिना - ८ ते १० पाने ४. आलं - १ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेलं)५. कडीपत्ता - ३ ते ४ पाने ६. चणा डाळ - १ कप (कोरडी भाजून घेतलेली)७. जिरं - १ टेबलस्पून८. हिंग - १/२ टेबलस्पून९. चाट मसाला - १ टेबलस्पून १०. सैंधव मीठ - १/२ टेबलस्पून ११. आमचूर पावडर - १ टेबलस्पून १२. तेल - १ टेबलस्पून१३. मीठ चवीनुसार
सुप्रसिद्ध शेफ तारला दलाल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरून ड्राय भेळ पावडर कशी बनवावी याचे साहित्य व कृती याची रेसिपी शेअर केली आहे.
कृती :-
१. एका मिक्सरच्या भांड्यात वरील सर्व जिन्नस एकत्रित करुन घालावेत. २. आता हे सर्व मिश्रण मिक्सर मधून २ वेळा फिरवून बारीक करून घ्यावे. ३. या मिश्रणाची जाडसर पावडर मिक्सर मधून वाटून घ्यावी.
ही ड्राय भेळ पावडर एका काचेच्या हवाबंद बरणीत स्टोअर करुन ठेवा. ही ड्राय भेळ पावडर फ्रिजमध्ये व्यवस्थित रेफ्रिजरेट करून ठेवल्यास पुढील १ ते २ महिने चांगली टिकते.
आपली ड्राय भेळ पावडर तयार आहे. आता घरच्या घरी सुकी भेळ तयार करण्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये कुरमुरे, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, उकडलेला बटाटा, शेंगदाणे, फरसाण, मसाला डाळ, पापडी, बारीक नायलॉन शेव व तयार केलेली ड्राय भेळ पावडर घाला. हे सगळे जिन्नस चमच्याच्या मदतीने एकत्रित करून घ्यावेत. ड्राय भेळ पावडर वापरुन तयार केलेली सुकी भेळ खाण्यासाठी तयार आहे.