उन्हाळा सुरू झाल्यावर दही आणि ताकाचा आहारात समावेश करणं फार गरजेचे असते. दही खाणे हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. भारतीय स्वयंपाकामध्ये कढी, ताक, मठ्ठा, कोशिंबिरीमध्ये दह्याचा वापर केला जातो. निरोगी आणि सृदृढ शरीरप्रकृतीसाठी दररोजच्या आहारात कमीतकमी एक वाटी दह्याचा जरूर समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. सध्या बाजारात विविध ब्रॅन्डचे फ्लेवर्ड दही सहज उपलब्ध होते. परंतु घरी बनवलेल्या दह्याची चव आणि ते खाण्याची गंमत काही वेगळीच असते.
काहीवेळा आपण विकतचे दही बाहेरुन आणतो, मात्र हे दही बऱ्याचदा प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा डब्यांतून दिले जाते. बाहेरुन विकत आणलेले दही कधी पातळ, पाणचट किंवा आंबट असते. त्यामुळे घरीच दही तयार करणं हे नेहमीच चांगलं. मुळात दही तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी पाच ते दहा मिनीटांमध्ये आपण दह्याला विरजण लावू शकता. मात्र कधी कधी घरी लावलेलं दही घट्ट तयार होत नाही. यासाठी आपण दह्याला विरजण लावण्याची पारंपरिक पद्धत न वापरता एक नवीन सोपी ट्रिक करुन पाहा(How To Make Curd Or Dahi At Home : Homemade Dahi Recipe).
साहित्य :-
१. पाणी - पाव कप
२. दूध - गरजेनुसार
३. कॉर्नफ्लॉवर - १ टेबलस्पून
४. मिल्क पावडर - १ टेबलस्पून
दही तयार करताना, विरजण लावताना दह्याचा वापर न करता बर्फीसारखे दह्याचे काप कसे करावेत यासाठी masalakitchenbypoonam या इंस्टाग्राम पेजवरून झटपट दही घरी तयार करण्याची सोपी ट्रिक सांगितली आहे.
कृती :-
१. सर्वप्रथम एका भांड्यात पाव कप पाणी घालून घ्यावे. मग त्यात दूध ओतावे. आता हे गॅसवर ठेवून एक उकळी फुटेपर्यंत व्यवस्थित गरम करुन घ्यावे.
२. आता हे गरम झालेले दूध गॅसवरून उतरवून घ्यावे. या गरम करुन घेतलेल्या दुधातील २ कप दूध वेगळ्या भांड्यात काढून घ्यावेत. उरलेले दूध बाजूला तसेच ठेवावे.
३. त्यानंतर वेगळया भांड्यात काढून घेतलेल्या दुधात प्रत्येकी १ टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर व मिल्क पावडर घालून ते मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळत रहावे.
४. आता जे उरलेलं दूध बाजूला ठेवलं होत ते परत गॅसवर ठेवून त्यात, कॉर्नफ्लॉवर व मिल्क पावडर मिसळलेले दूध घालावे.
५. हे मिश्रण गॅसवर मंद आचेवर ठेवून चमच्याने सारखे ढवळत राहावे.
६. हे मिश्रण थोडे हलके गरम करुन घ्यावे.
७. आता हे तयार झालेले मिश्रण गॅसवरून खाली उतरवून त्यातील १ कप दूध एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घ्यावे.
८. एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेतलेले दूध रवीच्या मदतीने चांगले घुसळून घ्यावे.
९. बाऊलमधील दूध चांगले घुसळून घेतल्यानंतर ते परत उरलेला भांड्यातील दुधात मिसळून, पुन्हा एकदा रवीच्या मदतीने सगळेच दूध एकत्रित घुसळून घ्यावे.
१०. आता एक मोठा पॅन घेऊन त्यात वृत्तपत्राचा एक जाडसर थर रचून घ्यावा. त्यावर एक खोलगट भांड ठेवावं.
११. त्यानंतर या खोलगट भांड्यात, तयार केलेले मिश्रण ओतून त्यांवर झाकण ठेवून झाकून ठेवावे.
१२. आता किमान ५ तासांसाठी हे तसेच झाकून ठेवून द्यावे.
बर्फीसारखे काप झालेले दही खाण्यासाठी तयार आहे.