Join us  

मस्त- खमंग- खुसखुशीत धपाटे एकदा खाऊन तर पहा! मराठवाड्याची खास पारंपरिक डिश, शाळेच्या डब्यासाठी परफेक्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 7:23 PM

How To Make Dhapate At Home : Homemade Recipe : ज्वारीच्या पिठाचे धपाटे आणि लोणी चविष्ट नाश्ता, पहा सोपी पारंपरिक कृती...

महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात असे काही पदार्थ आहेत की जे बऱ्याच ठिकाणी सारख्याच पद्धतीनं केले जातात पण ज्यांची नावं मात्र वेगवेगळी आहेत. असाच थालीपिठाशी मिळता - जुळता पदार्थ म्हणजे 'धपाटे'. धपाटे या नावातच त्या पदार्थाची कृती दडलेली आहे. धपाधप थापून केले जातात म्हणून ते धपाटे. ज्वारीच्या पिठाचे धपाटे हे मुळातच मराठवाड्याची सर्वात लोकप्रिय अशी सुप्रसिद्ध डिश आहे. धपाटे हा एक असा पदार्थ आहे की, जो आपण सकाळच्या नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणाला देखील खाऊ शकतो. 

'धपाटे' हा एक महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात धपाटे आवडीने बनवले आणि खाल्ले जातात. हा पदार्थ अनेक लोकांच्या अतिशय आवडीचा पदार्थ आहे, त्यामुळे महाराष्ट्रीयन स्वयंपाक घरात तर हा पदार्थ नक्कीच बनवला जातो. ज्वारीचे पीठ वापरून केले जाणारे धपाटे दही, शेंगदाण्याची चटणी, मिरचीचा ठेचा यांच्यासोबत सर्व्ह केले जाते. गरमागरम तव्यातून ताटात काढलेले धपाटे खाण्यात मज्जा काही औरच असते. धपाटे झटपट घरच्या घरी बनवण्याची सोपी कृती पाहूयात(How To Make Dhapate At Home).

साहित्य :- 

१. ज्वारीचे पीठ - २ कप २. गव्हाचे पीठ - १ कप ३. बेसन - १ कप ४. कोथिंबीर - १,१/२ कप (बारीक चिरून घेतलेली)५. हिरवी मिरची व लसूण पाकळ्यांची पेस्ट - १ टेबलस्पून ६. हिंग - चवीनुसार ७. हळद - १ टेबलस्पून ८. मिरची पावडर - १ टेबलस्पून ९. धणे पूड - १ टेबलस्पून   १०. जिरे पूड - १ टेबलस्पून    ११. ओवा - १/२ टेबलस्पून   १२. पांढरे तीळ - २ चमचे १३. मीठ - चवीनुसार१४. पाणी - गरजेनुसार १५. तेल - गरजेप्रमाणे 

उडपीस्टाइल परफेक्ट डोसा होण्यासाठी पिठात घाला १ गोष्ट, युक्ती छोटी पण डोसा भारी...

कृती :- 

१. सर्वप्रथम, एका मोठ्या बाऊलमध्ये ज्वारीचे, गव्हाचे पीठ, बेसन ही सगळी पीठ एकत्रित करून घ्यावी. २. ही सगळी पीठ एकत्रित करून घेतल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची व लसूण पाकळ्यांची पेस्ट घालून घ्यावी. ३. आता यात चवीनुसार हिंग, हळद, मिरची पावडर, धणे पूड, जिरे पूड, ओवा, पांढरे तीळ, मीठ घालून घ्यावे. ४. त्यानंतर यात गरजेनुसार पाणी घालून धपाट्यांचे पीठ घट्ट मळून घ्यावे. पीठ मळून झाल्यानंतर याचे मोठे गोळे करून घ्यावेत. 

नाश्त्याला करा पोटभरीची आणि चमचमीत ‘मसाला चपाती’, साध्या चपातीला खास मसाला ट्विस्ट...

सकाळी नाश्त्याला घाईत फक्त १० मिनिटांत करा झटपट ‘मसाला पराठा’, चव उत्तम-नाश्ता पोटभर...

५. आता एक सुती कापड घेऊन त्यावर थोडेसे पाणी शिंपडून कापड थोडे भिजवून घ्यावे. ६. या भिजलेल्या कापडावर पिठाचा एक मोठा गोळा ठेवून तो गोलाकार थापून घ्यावा. धपाटे गोलाकार थापून झाल्यावर त्याच्या बरोबर मधोमध २ ते ३ छिद्र बोटांनी करून घ्यावी. ७. आता एका पॅनमध्ये तेल सोडून त्यावर हे धपाटे दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावे. धपाटे भाजत असताना पुन्हा एकदा पॅनच्या चारही बाजुंनी तेल सोडून, धपाटे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यावेत. 

असे गरमागरम धपाटे लोण्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करावेत.

टॅग्स :अन्नपाककृती