Join us  

घरच्याघरी तयार करा ढोकळा प्रिमिक्स, विकतसारखा सॉफ्ट - स्पॉंजी ढोकळा करा अगदी १० मिनिटांत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2024 11:37 AM

Instant Khaman Dhokla Premix : How to make Soft and Spongy Khaman Dhokla Recipe : ढोकळा करण्यासाठी आता खूप मोठा घाट घालायची गरज नाही, ढोकळा करता येईल काही मिनिटातच, अशी सोपी रेसिपी...

ढोकळा हा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. बरेचदा आपण सकाळच्या नाश्त्यात काहीतरी वेगळं म्हणून ढोकळा खाणे पसंत करतो. ढोकळा खायला  कितीही आवडत असला तरीही तो बनवणे म्हणजे फारच वेळखाऊ आणि किचकट काम आहे. जर ढोकळा करताना एखाद्या जरी पदार्थाचे प्रमाण चुकले तर हा ढोकळा हवा तसा तयार होत नाही. एवढेच नाही तर काहीवेळा ढोकळा (instant dhokla premix recipe) मनासारखा स्पॉंजी, सॉफ्ट होत नाही. यासोबतच ढोकळा बनवायचा म्हणजे त्याची सगळी साग्र - संगीत सगळीच तयारी करावी लागते. म्हणून शक्यतो आपण घाई गडबडीच्या वेळी ढोकळा बनवणे टाळतो(Dhokla premix Recipe).

झटपट ढोकळा बनवता यावा अशी काहीतरी सोपी ट्रिक असावी असे आपल्याला वाटते. यासाठी आपण घरच्या घरी ढोकळा प्रिमिक्स बनवून ठेवू शकतो. या ढोकळा प्रिमिक्सचा वापर करून आपण अगदी काही मिनिटांत चटकन ढोकळा बनवू शकतो. पटकन ढोकळा बनवण्यासाठी त्याआधी ढोकळा प्रिमिक्स कसे तयार करावेत याची सोपी रेसिपी पाहूयात(How to make Dhokhla premix at Home).   

साहित्य :-

१. सफेद उडीदाची डाळ - ५० ग्रॅम २. साखर - ६ टेबलस्पून ३. मीठ - ५ टेबलस्पून ४. सिट्रिक अ‍ॅसिड - ३ टेबलस्पून५. रवा - १०० ग्रॅम ६. बेसन - १/२ किलो ७. इनो - ६ टेबलस्पून 

कृती :- 

१. सर्वप्रथम मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात सफेद उडीदाची डाळ, साखर, मीठ, सिट्रिक अ‍ॅसिड घेऊन हे सर्व मिश्रण एकदम बारीक पूड होईपर्यंत व्यवस्थित वाटून घ्यावे. २. त्यानंतर त्यात रवा घालून हलकेसे पुन्हा एकदा वाटून घ्यावे. आता हे मिश्रण चाळणीत काढून व्यवस्थित चाळून घ्यावे. ३. आता या मिश्रणात बेसन घालावे, बेसन देखील संपूर्ण चाळून घेऊन मगच या मिश्रणात घालावे. ४. सगळ्यात शेवटी या मिश्रणात इनो घालून हे सगळे जिन्नस एकदा चमच्याने नीट हलवून एकजीव करुन घ्यावे. 

ढोकळा प्रिमिक्स तयार आहे. हे ढोकळा प्रिमिक्स आपण एका काचेच्या हवाबंद बरणीत स्टोअर करुन ठेवू शकता. 

फ्रिज अगदी खच्चून भरला आहे ? रिकामी जागाच नाही, फ्रिज ऑर्गनाईझ करण्याची सोपी पद्धत... 

घाई गडबडीच्यावेळी अगदी कमी साहित्यात नाश्त्याला करा  कुरकुरीत गोड आप्पे, पाहा सोपी रेसिपी... 

या प्रिमिक्सचा वापर करून ढोकळा कसा करावा ?

एका मोठ्या बाऊलमध्ये १.५ कप तयार ढोकळा प्रिमिक्स घेऊन त्यात १ कप पाणी घालून मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे. तयार प्रिमिक्स भिजवून झाल्यानंतर त्यात १ टेबलस्पून तेल घालावे.आता हे तयार प्रिमिक्सचे बॅटर एका भांड्यात काढून हे भांड कुकरमध्ये ठेवून २० मिनिटांकरीता वाफवून घ्यावे. त्यानंतर ढोकळा तयार झाल्यावर त्याचे लहान चौकोनी तुकडे करून घ्यावे. आता १ कप गरम पाणी करुन त्यात वाटून बारीक केलेली साखरेची पूड घालावी. हे मिश्रण चमच्याने ढोकळ्यावर घालावे. त्यानंतर फोडणीसाठी तेलात हिंग, जिरे, मोहरी, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, पांढरे तीळ घालून फोडणी तयार करावी. ही फोडणी ढोकळ्यावर घालावी. 

तयार केलेल्या प्रिमिक्सचा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृतीकिचन टिप्स