सकाळी झोपेतून उठलो की आज कोणती भाजी करायची असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडतो. मग फ्रिजमध्ये कोणत्या भाज्या आहेत याची चाचपणी होते आणि कोणाला काय आवडते कोणाला नाही याची गोळाबरीज करुन अखेर कोणती तरी एक किंवा २ भाज्या करण्याचे नक्की होते. यामध्ये डब्यासाठी एखादी कोरडी भाजी केली जाते. तर एक ओलसर भाजी करतो. आता भाजी करायची म्हटल्यावर त्या भाजीला घालायला वाटण-घाटण तर हवं ना. सकाळच्या घाईत हे वाटत करत बसलो तर आपला त्यात बराच वेळ जातो आणि मग आपलं सगळंच शेड्यूल बिघडून जातं. पण अशावेळी घरात वाटण तयार असेल तर स्वयंपाक वेळेत तर होतोच पण तो चविष्ट झाल्याने घरातीलही सगळीच मंडळी खूश होतात. आता भाज्यांसाठी ३ वेगळ्या प्रकारचे वाटण कसे करायचे ते पाहूया (How To Make Different Type Of Gravies For Vegetables)...
१. खोबऱ्याची हिरवी ग्रेव्ही
उसळी, फ्लॉवर बटाटा रस्सा किंवा कोणत्याही भाजीला चालेल असं हे वाटण आपण विकेंडला करुन ठेवू शकतो. यासाठी भरपूर ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कडीपत्ता, आलं, लसूण असं सगळं एकत्र करायचं आणि मिक्सरमधून बारीक वाटून ठेवायचं. हे ओलं वाटण तयार असेल की स्वयंपाक अगदी झटपट होतो.
२. खड्या मसाल्याचं वाटण
यासाठी काळी मिरी, लाल मिरच्या, लवंग, दालचिनी, तमालपत्र सगळं छान खरपूस भाजून घ्यायचं. तसंच सुकं खोबरं, जीरं, धणे असं सगळंच खमंग भाजल्यावर ते मिक्सरमधून फिरवून ठेवायचं. हे सुकं वाटण आपण कोणत्याही भाजीला झटपट वापरु शकतो. यामध्ये आवडीनुसार खसखस किंवा मसाल्याचे इतर पदार्थही घालू शकतो.
३. कांदा-टोमॅटोचं वाटण
कांदा आणि टोमॅटो हा ग्रेव्हीच्या भाजीमधील महत्त्वाचा घटक आहे. भाजीला घट्टपणा येण्यासाठी आपण आवर्जून हे दोन्ही पदार्थ वापरतो. हे दोन्ही बारीक तुकडे करुन थोडे परतून घेऊन मग मिक्सरमधून बारीक केले तरी चालते किंवा न भाजता तसेच मिक्सरमधून फिरवले तरी चालते. आवश्यकता असल्यास यामध्ये आलं, लसूण घालता येते. पण हे वाटण तयार असेल तर आपल्याला अगदी कोणत्याही प्रकारची भाजी झटपट करता येते.