गणपतीचा आवडता खाऊ म्हणजे मोदक. मोदकांचे कितीतरी प्रकार करता येतात. सुक्या खोबऱ्याचे, तळणीचे, खोबऱ्याच्या ओल्या सारणाचे तळणीचे, उकडीचे, खव्याचे तळणीचे असे नेहमीचे विविध प्रकारचे मोदक करुनही काही वेगळे प्रकारचे मोदक करु शकतो. बाप्पाला दहा दिवस दोन्ही वेळेस नवनवीन प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य दाखवता येतो. नैवेद्यासाठी चविष्ट आणि आरोग्यदायी प्रकार (healthy modak) करायचे असतील तर नागलीच्या आणि ज्वारीच्या पिठाचे मोदक (different types of modak with sorghum and finger millet flour) तयार करता येतात. हे मोदक करायला सोपे असून (how to make sorghum and finger millet flour modak) सामग्रीही कमी लागते. बाप्पासाठी वेगळ्या पध्दतीचे चविष्ट आणि पौष्टिक नैवेद्य केल्याचं समाधानही मिळतं.
Image: Google
कसे करायचे नागलीचे मोदक?
नागलीचे मोदक तयार करण्यासाठी पाऊण कप नागलीचं पीठ, अर्धा कप कणिक, पाव कप ज्वारीचं पीठ, अर्धा चमचा वेलची पूड, 1 कप साजूक तूप आणि;चवीनुसार पिठी साखर घ्यावी.
नागलीचे मोदक तयार करण्यासाठी कढईत तूप गरम करायला ठेवावं. सर्व पिठं एकत्र करुन खमंग भाजून घ्यावे. तूप सुटपर्यंत पीठ भाजावं.;पीठ भाजलं की ताटात काढून घ्यावं. भाजलेलं पीठ पूर्ण थंड होवू द्यावं. ;पीठ गार झाल्यावर त्यात चवीनुसार पिठी साखर मिसळावी. पीठ गरम असताना पिठी साखर मिसळू नये. साखरेच्या गुठळ्या होतात. मोदक मऊ होत नाहीत. गार झालेल्या पिठात पिठी साखर आणि वेलची पूड मिसळावी. हे सर्व नीट एकत्र करुन घ्यावं. थोडं थोडं मिश्रण हातावर घेऊन ते मऊ करुन त्याला मोदकाचा आकार द्यावा. मोदक करायचे नसल्यास याच मिश्रणाचे लाडू वळले तरी चालतात. वेगळ्या आणि खमंग चवीचे नागलीचे मोदक किंवा लाडू छान लागतात.
Image: Google
ज्वारीच्या पिठाचे उकडीचे मोदक
ज्वारीच्या पिठाचे उकडीचे मोदक करण्यासाठी 1 नारळ फोडून खोवून घ्यावं. एका नारळाला दीड वाटी बारीक चिरलेला गूळ, अर्धा चमचा वेलची पूड, 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 2 वाट्या पाणी, मीठ, थोडी साखर. 1 चमचा तांदळाची पिठी आणि 1 चमचा साजूक तूप घ्यावं.
ज्वारीच्या पिठाचे मोदक करताना आधी सारण तयार करुन घ्यावं. सारणासाठी नारळ फोडून ते खोवून घ्यावं. मोदकांसाठी खोबरं किसून घेण्यापेक्षा खोवून घ्यावं. खोबरं खोवलं की गॅसवर कढई ठेवावी. त्यात अर्धा चमचा तूप घालावं. तूप गरम झालं की खोबरं परतून घ्यावं. नंतर त्यात किसलेला गूळ घालावा. मिश्रण चांगलं परतून घ्यावं. ते एकदम कोरडं करु नये. बोटांना मिश्रण चिकट लागलं की गॅस बंद करावा. सारणात 1 छोटा चमचा तांदळाची पिठी घालून सारण हलवून घ्यावं. नंतर त्यात वेलची पूड घालून सारण पुन्हा एकजीव करुन थंड होवू द्यावं. सारण थंड होईपर्यंत ज्वारीच्या पिठाची उकड काढावी. आधी ज्वारीचं पीठ पिठाच्या चाळणीनं चाळून घ्यावं. जाड बुडाच्या भांड्यात किंवा कढईत पाणी गरम करण्यास ठेवावं. पाण्यात थोडं मीठ, छोटा चमचा साखर आणि 1 चमचा साजूक तूप घालावं. पाण्याला उकळी आली की त्यात ज्वारीचं पीठ घालावं. गॅसवरुन भांडं उतरवून पीठ भराभर ढवळावं. पीठ ढवळलं की पुन्हा ते गॅसवर ठेवून भांड्यावर झाकण ठेवून उकडीला दोन ते तीन वाफा काढाव्यात. उकड मळून घेण्यासाठी पसरट ताट घ्यावं. ताटाला तूप लावून उकड मळून नरम करावी. उकड मळून झाली की मोदक पात्रात किंवा भांड्यात पाणी ठेवून ते उकळावं. पाण्याला उकळी फूटेपर्यंत मळलेल्या उकडीची पारी करुन त्यात सारण भरुन मोदक करावेत. ते मोदक पात्रात किंवा चाळणीत ठेवून् 10-12 मिनिटं उकडावेत. मोदक उकडल्यानंतर गॅस बंद करावा.2-3 मिनिटांनी झाकण काढून मोदकांची वाफ निघून जावू द्यावी आणि नंतर उकडलेले मोदक एका भांड्यात काढून घ्यावेत.