रेशमासारख्या मऊसूत फेण्यांची खीर करणं हे खरं तर कौशल्याचं काम.. जेवणात तुम्ही कोणताही पदार्थ केलात तरी तुमच्या कोणत्याही मेन्यूसोबत ही स्वीट डिश अगदी सहज मॅच होऊन जाते. शिवाय हा आपला पारंपरिक पदार्थ असल्याने खवय्यांना तर हा गोड पदार्थ विशेष आवडतो... त्यामुळेच तर संक्रांतीच्या हळदी- कुंकू कार्यक्रमाला येणाऱ्या मैत्रिणींसाठी करून टाका हा स्पेशल बेत.. करायला अतिशय सोपा आणि झटपट होणारा... फेणीची खीर अगदी परफेक्ट पद्धतीने कशी करायची हे सांगत आहेत औरंगाबादच्या प्रसिद्ध शेफ राजश्री अग्रवाल.
फेणीची खीर करण्यासाठी लागणारं साहित्य
फेणी, २ ते ३ टेबलस्पून तूप, १ लीटर दूध, ७ ते ८ टेबलस्पून साखर, सुकामेवा, केशर, अर्धा टी स्पून विलायची पावडर.
कशी करायची फेणीची खीर (How to make feni kheer)?
- सगळ्यात आधी तर स्टीलची कढई गॅसवर तापत ठेवा. त्यात अर्धा कप पाणी टाका. यामध्ये आता दूध टाका. खीर खाली कढईच्या तळाला लागू नये, म्हणून दूध टाकण्याआधी थोडं पाणी टाकावं असा स्मार्ट उपाय राजश्री अग्रवाल यांनी सुचविला आहे.
- यानंतर दूध उकळायला ठेवून द्या.
- दूध उकळेपर्यंत दुसऱ्या गॅसवर एक पॅन ठेवा. त्यात १- २ टेबलस्पून तूप टाका. त्यात बदामाचे तुकडे टाका. थोडं फ्राय करून बदाम पॅनमधून बाहेर काढून घ्या. आता त्यात काजू टाका. ते ही फ्राय करा आणि सोनेरी रंगाचे झाले की पॅनमधून काढून घ्या.
- आता फेणी थोडी क्रश करून पॅनमध्ये टाका. तुपात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फेणी परतून घ्या. त्यानंतर ती देखील पॅनमधून बाहेर काढून घ्या.
- आता दुध उकळून थोडेसे आटले की त्यात साखर टाका. साखर टाकून दूध थोडे पुन्हा उकळू द्या. त्यानंतर त्यात तुपात परतलेली फेणी टाका. त्यानंतर तुपात परतलेले ड्रायफ्रुट्स, विलायची पावडर, किसमिस असं सगळं टाकून झालं की सगळ्यात शेवटी केशर टाका.
- हे सगळे साहित्य टाकून झाल्यानंतर पुन्हा ५ ते ७ मिनिटे खीर उकळू द्या. यानंतर गरम किंवा थंड अशी तुमच्या आवडीनुसार खीर खाण्याचा आनंद घ्या...