Join us  

ताज्या करकरीत कैरीची करा ‘फोडणीची कैरी’; तोंडी लावायला झटपट पदार्थ- उन्हाळा होईल सुसह्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2023 5:20 PM

How To Make Fodnichi Kairi : Recipe : फोडणीची कैरी करायला अगदी सोपी आणि झटपट प्रकार आहे.

उन्हाळ्याची सुरुवात झाली की आंबा आणि कैरी प्रेमींना अतिशय आनंद होतो. उन्हाळ्यात अंगाची कितीही लाही लाही होत असली आणि हे त्रासदायक वाटत असले तरीही उन्हाळयातच येणाऱ्या कैरीच्या आशेने सर्वजण दरवर्षी या सीझनची वाट पाहत असतात. रसरशीत आंबट - गोड कैरीवर मीठ, मसाला, चाट मसाला वैगरे भुरभुरून खाण्याचे सुख काही वेगळेच असते. उन्हाळा सुरु झाला की आपल्याला बाजारांत हिरव्यागार कच्च्या कैऱ्या विकायला ठेवलेल्या दिसतात. या कच्च्या कैऱ्या विकत आणून आपण त्यापासून अनेक साठवणीचे पदार्थ तयार करतो आणि वर्षभर या कच्च्या कैऱ्यांचा आस्वाद घेतो. कच्च्या कैरीचे लोणचे, पन्हं, छुंदा असे अनेक पदार्थ बऱ्याचजणांच्या घरी बनतात. 

जेवणासोबत तोंडी लावायला म्हणून आपण कैरीची चटणी, लोणचे आंबा डाळ असे अनेक पदार्थ ताटात वाढून घेतो. या आंबट - गोड चवीच्या हिरव्यागार कैरीच्या पदार्थांमुळे जेवणाची रंगत वाढते. कैरीपासून केला जाणारा छुंदा, मेथांबा, साखरांबा, गुळांबा, कैरीचं वर्षभर टिकणारं लोणचं असे प्रकार आपण आतापर्यंत खाल्लेच असतील. आत आपण जेवणात झटपट तोंडी लावायला म्हणून फोडणीची कैरी सुद्धा करु शकतो. फोडणीच्या कैरीची चव थोडीफार कैरीच्या लोणच्यासारखीच असते परंतु ते बनवताना लोणच्यासारखा खूप मोठा घाट घालावा लागत नाही. झटपट फोडणीची कैरी कशी बनवायची ते पाहूयात(How To Make Fodnichi Kairi : Recipe).  

साहित्य :- 

१. मोहरी - १ टेबलस्पून २. जिरे - १ टेबलस्पून ३. हिंग - १/२ टेबलस्पून ४. लसूण पाकळ्या - ५ ते ६ (बारीक चिरलेला) ५. कढीपत्ता - ७ ते ८ पान ६. हळद - १ टेबलस्पून ७. लाल तिखट मिरची पावडर - १ टेबलस्पून ८. गुळ - २ टेबलस्पून (किसून बारीक केलेला) ९. मीठ - १ टेबलस्पून१०. तेल - २ ते ३  टेबलस्पून  

कृती :- 

१. सर्वप्रथम कैरीचा देठ मोडून तिथून येणारा चीक काढून घ्यावा. त्यानंतर कैऱ्या स्वच्छ पाण्यांत धुवून घ्याव्यात. २. आता या कैरीच्या मध्यम आकाराच्या फोडी करुन घ्याव्यात. ३. आता एका कढईत थोडेसे तेल घेऊन त्यात मोहोरी, जिरे, बारीक चिरलेला लसूण, कढीपत्ता, हिंग, लाल तिखट मिरची पावडर, हळद, किसून बारीक केलेला गूळ हे सर्व जिन्नस एकत्रित करुन घ्यावेत. आता गूळ संपूर्णपणे विरघळून होईपर्यंत हे मिश्रण चमच्याने ढवळत रहावे. 

घरात कैरी असो नसो २ मिनिटांत बनवा थंडगार पन्हं ! पाहा ही जादू कशी करायची...

४. सर्वात शेवटी या मिश्रणात कैरीच्या फोडी व मीठ घालावे. चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यावे. ५. आत गॅस बंद करून तयार झालेली फोडणीची कैरी एका बाऊलमध्ये काढून घ्यावी. ६. फोडणीची कैरी थोडी थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यांत भरुन स्टोअर करुन ठेवावी. 

कच्च्या कैरीची घरीच पटकन बनवा आंबटगोड कॅण्डी, तोंडाला पाणीच सुटेल असा मस्त पदार्थ...

आपली फोडणीची कैरी खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम डाळ - भात किंवा चपातीसोबत तोंडी लावायला म्हणून फोडणीची कैरी हा उत्तम पर्याय आहे.

टॅग्स :अन्नपाककृती