जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी असेल तर साध्या जेवणालाही रंगत येते. नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला तर तुम्ही तोंडी लावण्यासाठी लोणचं, चटणी खाऊ शकता. (Cooking Tips) लसणाची चटणी ही वरण-भाताबरोबर तसंच चपातीबरोबरही चांगली लागते. लसणाची चटणी करण्यासाठी तुम्हाला फार सामान लागणार नाही. घरच्याघरी मोजक्या साहित्यापासून तुम्ही चविष्ट चटणी बनवू शकता. (Garlic Chutney Recipe)
लसणाची चटणी करण्याची इस्टंट रेसिपी (How To Make Instant Garlic Chutney)
सगळ्यात आधी १ वाटी लसूण सोलून घ्या. सोललेले लसूण खलबत्त्यात घाला. त्यात लाल तिखट आणि मीठ घालून लसूण बारीक वाटून घ्या. नंतर या लसणांवर गरम तेल घाला त्यानंतर १ लिंबू पिळा. चमच्याच्या साहाय्याने चटणी ढवळून एकजीव करून घ्या. तयार आहे झणझणीत लसणाची चटणी.
राजस्थानी लसणाची चटणी कशी करायची (How To Make Rajsthani Garlic Chutney)
राजस्थानी लसणाची चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी ब्लेंडरमध्ये लसणाच्या कळ्या, सुक्या लाल मिरच्या, लाल मिरची पावडर, जीरं, मीठ आणि पाणी घाला. सर्व पदार्थ एकत्र करून बारीक वाटून स्मूद पेस्ट बनवा. एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा नंतर गरम तेलात मोहोरी घाला. जेव्हा मोहोरी तडतडू लागेल तेव्हा वाटलेली चटणी यात घाला. त्यानंतर थोडं पाणी घाला. नंतर मीडियम फ्लेमवर शिजू द्या.
रोज ताक प्यायल्यानं वजन कमी होतं? डॉक्टर सांगतात, ताकाचा शरीरावर काय परिणाम होतो
चटणी तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या. तेल सुटल्यानंतर चमच्याने चटणी ढवळून घ्या. चटणी शिजत असतानाही ढवळत राहा जेणेकरून चटणी करपणार नाही. यात तुम्ही आवडीनुसार लिंबू पिळून घालू शकता. तयार आहे राजस्थानी स्टाईल लसणाची चटणी, गरमागरम पराठे किंवा वरण-भाताबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता.
टोमॅटो-लसणाची चटणी (Tomato Garlic Chutney)
मिक्सरमध्ये लसणाच्या पाकळ्या, टोमॅटो, लाल मिरची पावडर, जीरं आणि चवीनुसार मीठ घाला. सर्व साहित्य व्यवस्थित वाटून बारीक पेस्ट बनवून घ्या.या चटणीला तुम्ही तेलाची फोडणी देऊ शकता किंवा असंच खाऊ शकता. तयार आहे टोमॅटो-लसणाची चटणी. ही चटणी तुम्ही भजी, पराठे, चपाती किंवा वरण-भाताबरोबर खाऊ शकता.