Join us  

कोवळ्या लुसलुशीत हरबऱ्याचं बनवा खमंग धिरडं... नाश्त्यासाठी ठरेल हा परफेक्ट मेन्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 7:35 PM

Food And Recipe: हरबरा डाळीच्या पीठाचं धीरडं तर नेहमीच खातो.. सध्या सिझन आहे तर कोवळ्या, लुसलुशीत हरबऱ्याचं खमंग धीरडं खाऊन बघा.. चव तर बेस्ट आहेच, पण आरोग्यासाठीही अतिशय पोषक आहे...

ठळक मुद्देहरबऱ्यामध्ये मॉलिक ॲसिड आणि ऑक्झालिक ॲसिड चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे पचनाचा त्रास दुर होतो.

सध्या बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारे कोवळे लुसलुशीत, हिरवेगार हरबरे (green chana) आता लवकरच पिवळे पडून पक्के व्हायला लागतील. त्यामुळेच तर त्या आधी ही एक मस्त रेसिपी ट्राय करून बघा. हरबरा डाळीच्या पीठाचं धीरडं आपण नेहमीच करतो. हरबऱ्यांमध्ये प्रोटीन्सचं उत्तम प्रमाण असतं. त्यामुळे नाश्त्यासाठी धीरडं हा पदार्थ उत्तम मानला जातो. डाळीच्या पीठापेक्षा कोवळ्या हरबऱ्यांमध्ये तर प्रोटीन्सचे प्रमाण नक्कीच जास्त असते. त्यामुळे प्रोटीन रिच नाश्ता हवा असेल, तर हा पदार्थ नक्की करून बघा..

 

ओल्या हरबऱ्याचं धीरडं करण्यासाठी लागणारं साहित्य१. अर्धा कप हिरवे हरबरे, १ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, १ टीस्पून हरबरा डाळीचं पीठ,  २ टी स्पून दही, थोडासा बारीक चिरलेला कांदा, १/४ टीस्पून बेकींग पावडर, आवडीनुसार टोमॅटो, सिमला मिरची, पत्ताकोबी अशा भाज्या, अर्धा कप दाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ.

कसं करायचं धीरडं?- धीरडं करण्यासाठी सगळ्यात आधी थोडं पाणी आणि हरबरे मीठ टाकून कुकरमध्ये टाका आणि एक शिट्टी होऊन उकडून घ्या.- पाणी वेगळं करा आणि उकडलेल्या हरबऱ्यामध्ये मिरचीची पेस्ट, हरबरा डाळीचं पीठ, दही, कांदा असं सगळं टाकून मिक्सरमधून बारीक करून घ्या. हरबऱ्यात आधीही मीठ टाकलं होतं. त्यामुळे त्या मीठाचा अंदाज घेऊनच पुन्हा मीठ टाका. 

- आता एका नॉनस्टिक पॅनला थोडं तेल लावून घ्या. त्यावर या पीठाचा गोळा टाका. डोसा किंवा उत्तप्पाप्रमाणे जास्त पीठ फिरवून घेऊ नका. जरा जाडसरच राहू द्या. त्यावर आवडीनुसार बारीक चिरलेल्या भाज्या आणि दाण्याचा कुट टाका. आजूबाजूल तेल सोडा आणि त्यावर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. एका बाजूने चांगले परतून झाले की दुसऱ्या बाजूनेही परतून घ्या. - गरमागरम धीरडं झालं तयार. हे धीरडं सॉस, बटर किंवा चटणीसोबत खायला छान लागतं..

 

ओला हरबरा खाण्याचे फायदे (benefits of eating green chana)- हरबऱ्यामध्ये मॉलिक ॲसिड आणि ऑक्झालिक ॲसिड चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे पचनाचा त्रास दुर होतो.- स्नायुंना बळकटी मिळण्यासाठी हरबरे खाणे फायदेशीर मानले जाते.- ओल्या हरबऱ्यात लोह भरपूर प्रमाणात असते.- त्यामुळे हा पदार्थ हा एक उत्तम नाश्ता होऊ शकतो. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीआरोग्य