Join us  

शिळ्या पोळ्यांचे गुलाबजाम, ते ही १० मिनिटांत झटपट रेडी? कसं शक्य आहे, ही पाहा १ खास गोड ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 10:52 AM

How To Make Gulab jamun from Leftover Roti's Easy Recipe : नेहमी फोडणीची पोळी किंवा पोळीचा लाडू खाऊन कंटाळला असाल तर ट्राय करा हटके रेसिपी...

रात्रीच्या वेळी कधी आपल्याला कमी भूक असते तर कधी आपण बाहेरुन काहीतरी खाऊन आल्याने कमी जेवतो. अशावेळी पोळ्या उरतात. मग या पोळ्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला खाव्या लागतात. कधी चहा पोळी तर कधी फोडणीची पोळी, गूळ-तूप घालून लाडू असे करुन नाश्त्याला या पोळ्या संपवल्या जातात. पण नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल आणि या पोळ्यांचे मस्त वेगळे काहीतरी करायचे असेल तर आज आपण एक हटके आणि सगळ्यांना आवडेल असा पदार्थ पाहणार आहोत. हा पदार्थ म्हणजे गुलाबजाम असून जेवणात गोड वाढल्याने घरातील सगळेच खूश होतील. विशेष म्हणजे हे गुलाबजाम शिळ्या पोळ्यांपासून केले आहेत हेही कोणाच्याच लक्षात येणार नाही. कमीत कमी पदार्थांमध्ये अगदी झटपट होणारे हे गुलाबजाम कसे करायचे पाहूया (How To Make Gulab jamun from Leftover Roties Easy Recipe)...

१. साधारण ३ ते ४ पोळ्यांचे तुकडे करुन त्या मिक्सरमध्ये एकदम बारीक करुन घ्यायच्या.

(Image : Google)

२. यामध्ये साधारण १ कप गरम दूध आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून हे मिश्रण भिजत ठेवायचे

३. आता यामध्ये २ चमचे तूप, अर्धा चमचा बेकींग पावडर आणि चिमूटभर मीठ घालायचे.

४. यामध्ये साधारण १.५ कप मिल्क पावडर घालून हे मिश्रण हाताने चांगले एकजीव करुन पीठ मळायचे.

५. दंडगोल किंवा गोल असे आपल्याला आवडतील त्या आकाराचे गोळे करायचे आणि ते तेलात तळून घ्यायचे.

६. दुसरीकडे साखरेचा पाक करुन त्यामध्या हे गरम तळलेले गुलाबजाम सोडायचे.

 

७. पाक चांगला मुरला की हे गुलाबजाम अगदी विकतच्या गुलाबजामसारखे लागतात. 

८. मध्यभागी गुलाबजाम कापून त्यामध्ये क्रिम भरायचे आणि आवडीनुसार पिस्ता, बदाम, चांदीचा वर्ख असे आपल्या आवडीप्रमाणे लावायचे. 

९. आपण खव्याचे गुलाबजाम करतो किंवा विकत आणतो तितकेच हे गुलाबजाम छान लागतात. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.