Join us  

How to make Gulkand lassi : उन्हाळ्यात गुलकंद खा आणि गारेगार गुलकंद लस्सी प्या, पोटाला थंडावा देणारी गुलाबी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 12:19 PM

How to make Gulkand lassi : शरीराला आणि मनाला तरतरी आणणारी लस्सी हा पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसांत आपण कधी ना कधी पितोच. पण बाहेरची लस्सी पिण्यापेक्षा घरच्या घरी चांगले पदार्थ वापरुन आणि स्वच्छतेत आपणच ही लस्सी तयार केली तर?

ठळक मुद्दे वरच्या बाजूला लोणी घालून गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप किंवा टूटीफ्रूटी यांनी सजावट करु शकता.  याचप्रमाणे पान फ्लेवर, पिस्ता फ्लेवर, स्ट्रॉबेरी, मँगो अशा विविध फ्लेवरमध्ये ही लस्सी आपल्याला करता येते.

लस्सी म्हटल्यावर आपल्याला सगळ्यात आधी आठवतं ते पंजाब. दही आणि दुधाची भरभराट असणाऱ्या या राज्यात लस्सी आवर्जून प्यायली जाते. दही आणि दुधात असणाऱ्या प्रोटीन्समुळे हे पेय अतिशय आरोग्यदायी मानले जाते. पण आता केवळ पंजाबच नाही तर देशाच्या सगळ्याच भागात ही आंबट गोड लस्सी आवडीने प्यायली जाते. डोक्यावर तळपते उन असेल तर विचारायलाच नको. उकाड्यामुळे जेवण जात नसेल आणि तोंडालाही चव नसेल तर शरीराला आणि मनाला तरतरी देणारी आणि तरीही आरोग्यदायी असणारा पारंपरिक थंड पदार्थ म्हणजे लस्सी. आइस्क्रीम किंवा कोल्डड्रींकपेक्षा कित्येक पटींनी ताकद देणारा हा पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसांत आपण कधी ना कधी पितोच. पण बाहेरची लस्सी पिण्यापेक्षा घरच्या घरी चांगले पदार्थ वापरुन आणि स्वच्छतेत आपणच ही लस्सी तयार केली तर? (How to make Gulkand lassi) 

(Image : Google)

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी आरोग्यदायी असणारी ही लस्सी या उन्हाळ्यात तुम्ही नक्की ट्राय करुन बघा. इतकेच नाही तर उन्हाळ्यात आरोग्यासाठी अतिशय चांगला असणारा गुलकंद या लस्सीमध्ये घातल्यास त्याचा आरोग्याला आणखीनच फायदा होतो. उन्हामुळे होणारी उष्णता कमी करणारा, पित्तशामक आणि पचनासाठी चांगला असणारा गुलकंद उन्हाळ्यात आवर्जून खायला हवा. भर उन्हात गारेगार गुलकंद लस्सी प्यायल्यावर तुम्हाला नक्कीच थंडावा मिळेल. याचप्रमाणे पान फ्लेवर, पिस्ता फ्लेवर, स्ट्रॉबेरी, मँगो अशा विविध फ्लेवरमध्ये ही लस्सी आपल्याला करता येते. आता शरीराला आणि मनाला तरतरी आणणारी गुलकंद लस्सी घरच्या घरी कशी झटपट करता येईल ते पाहूया...

साहित्य -

१. दही - ३ वाट्या२. रोज सिरप - २ चमचे ३. वेलची पावडर - पाव चमचा ४. साखर - ३ चमचे ५. मीठ - पाव चमचा ६. गुलकंद - ३ चमचे ७. रोज इसेन्स - १ चमचा८. लोणी - २ चमचे९. गुलाबाच्या पाकळ्या - ५ ते ६ 

कृती -

१. घरात दुधाचे दही लावावे किंवा विकतचे आंबटगोड दही लावावे.

२. दही, रोज सिरप, साखर, मीठ, गुलकंद, वेलची पावडर हे सगळे एकत्र करुन मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. 

३. हे एकसारखे झालेले मिश्रण चांगले हलवून त्यामध्ये आवडीनुसार दूध घालू शकता, त्यामुळे त्याचा घट्टपणा थोडा कमी होण्यास मदत होते.

४. लस्सी ग्लासमध्ये घेतल्यावर त्यामध्ये आवडीनुसार जास्तीचा गुलकंद, रोज सिरप घालावे. 

५. वरच्या बाजूला लोणी घालून गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप किंवा टूटीफ्रूटी यांनी सजावट करु शकता. 

६. तयार झालेली लस्सी थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवून गार झाल्यावर प्यायला घ्यायची.   

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.समर स्पेशल