'झुणका' हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक शाकाहारी, झणझणीत मराठी खाद्यपदार्थ आहे. खरंतर झणझणीत झुणका भाकर हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीसमोर झणझणीत असं म्हटलं तर पहिलं डोळ्यांसमोर गरमागरम झुणका आणि ज्वारीची भाकर, वर जरासा मिरचीचा ठेचा, लिंबू, कांदा, शेंगदाण्याची चटणी हेच दिसत. झुणका बहुतेक लोक आवडीने खातात आणि महाराष्ट्राच्या बहुतेक भागांमध्ये झुणका हा बनवला जातो.
महाराष्ट्रातील विविध भागात झुणका करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. झुणका म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. मग तो तव्यावर केलेला झुणका असो किंवा कांदा घालून केलेलं पातळ पिठलं असो. झुणका खाण्यात एक वेगळीच मजा असते. गावाकडे रानात गेल्यावर झुणका कांदा आणि भाकरी खाणं म्हणजे अनेकांच्या आवडीची गोष्ट असते. शिवाय ऐनवेळी घरात काही भाजी नसेल तर पटकन करता येणारा पदार्थ म्हणजे 'झुणका'. घरच्या घरी झटपट 'झुणका' कसा तयार करायचा याची झटपट कृती पाहूयात(How To Make Homemade Zunka Recipe).
साहित्य :-
१. चणा डाळ - ६० ग्रॅम (भिजवून मिक्सरमध्ये वाटून बारीक करुन घेतलेली)
२. हिरव्या मिरच्या - २ ते ३ (बारीक चिरुन घेतलेल्या)
३. कांदा - १ (बारीक चिरुन घेतलेला)
४. आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
५. जिरे - १ टेबलस्पून
६. मोहोरी - १ टेबलस्पून
७. हळद - १/२ टेबलस्पून
८. लाल मिरची पावडर - १/२ टेबलस्पून
९. काश्मिरी लाल मिरची पावडर - १/२ टेबलस्पून
१०. धणे पावडर - १/२ टेबलस्पून
११. तेल - ३ ते ४ टेबलस्पून
१२. मीठ - चवीनुसार
१३. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१४. हिंग - चिमूटभर
१५. कढीपत्ता - ५ ते ६ पान
ताज्या करकरीत कैरीची करा ‘फोडणीची कैरी’; तोंडी लावायला झटपट पदार्थ- उन्हाळा होईल सुसह्य...
अस्सल सोलापुरी शेंगदाण्याची चटणी करा १० मिनिटांत, सोलापुरी चटणीची पारंपरिक रेसिपी...
कृती :-
१. सर्वप्रथम एका भांड्यात तेल घेऊन त्यात थोडेसे हिंग, मोहोरी, जिरे, कढीपत्ता व बारीक चिरलेला कांदा घालावा. हे सर्व जिन्नस मंद आचेवर थोडे शिजवून घ्यावे.
२. आता यात आलं - लसूण पेस्ट, हळद, लाल मिरची पावडर, काश्मिरी लाल मिरची पावडर, धणे पावडर, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यावी.
३. त्यानंतर भिजवून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली चणा डाळ घालावी. आता ही बारीक वाटून घातलेली चणा डाळ चमच्याने ढवळून एकजीव करुन घ्यावी.
४. तयार झालेल्या झुणक्यावर बारीक चिरुन घेतलेली कोथिंबीर भुरभुरावी. आता या भांड्यावर झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे झुणका व्यवस्थित शिजवून घ्यावा.
झुणका खाण्यासाठी तयार आहे. हा गरमागरम झुणका भाकरी, शेंगदाण्याची सुकी चटणी, कांदा यांच्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.