Join us  

विकेंडला ट्राय करा १० मिनिटांत होणारे स्पेशल इंदोरी पोहे, नेहमीच्या कांद्यापाेह्यांपेक्षा वेगळी खास चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2023 11:43 AM

How To Make Indori Poha Easy Recipe : नेहमीच्या चवीपेक्षा थोडे वेगळे आणि अतिशय छान लागणारे हे इंदौरी पोहे कसे करायचे पाहूया...

सकाळच्या नाश्त्याला किंवा कोणी पाहुणे आल्यावर पोहे हा झटपट होणारा आणि सगळ्यांच्या आवडीचा प्रकार आहे. पोटभरीचे असल्याने आणि गरमागरम असल्याने पोहे बरेचदा केले जातात. रोजच्या घाईत अनेक जण वेगळा नाश्ता करत नसले तरी विकेंडला मात्र आवर्जून पोहे केले जातात. पोहे म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर गरगमागरम कांदेपोहे किंवा बटाटा पोहे त्यावर कोथिंबीर, शेव असे चित्र येते. काहीवेळा आपण त्यात मटार, टोमॅटो, शेंगादाणे हेही घालतो. याशिवाय दही पोहे, दडपे पोहे हेही थोडे वेगळे पण अनेकांच्या आवडीचे प्रकार. हे सगळे प्रकार आलटून पालटून आपण नेहमीच खातो. मात्र इंदौरी स्टाइल पोहे आपण क्वचितच चाखले असतील. नेहमीच्या चवीपेक्षा थोडे वेगळे आणि अतिशय छान लागणारे हे इंदौरी पोहे कसे करायचे ते पाहूया (How To Make Indori Poha Easy Recipe)…

१. आपण पोहे करण्यासाठी पोहे धुवून भिजवतो त्याप्रमाणे भिजवायचे. साधारण ५ ते १० मिनीटे पोहे ओले असताना चाळणीत ठेवले तर ते चांगले फुगतात. 

(Image : Google)

२. दुसरीकडे एक मध्यम आकाराचा कांदा, मिरची कापून घ्यावे. 

३. एका ताटलीमध्ये कडीपत्त्याची ८ ते १० पाने, डाळींबाचे अर्धी वाटी दाणे, १ चमचा बडीशोप, १ चमचा धणे असे सगळे काढून घ्यावे. 

४. कढईमध्ये तेल घालून त्यात मोहरी, जीरं, हिंग आणि हळद घालून नेहमीप्रमाणे फोडणी करावी. 

५. फोडणी चांगली तडतडली की त्यामध्ये धणे, बडीशोप, कडीपत्ता, बारीक चिरलेली मिरची आणि कांदा घालावा. 

६. हे सगळे चांगले परतून घेऊन त्यानंतर छान मऊसर भिजलेले पोहे यामध्ये घालावेत. 

७. या पोह्यांवर चवीनुसार मीठ आणि साखर घालून ते चांगले एकत्र करुन परतून घ्यावेत.

८. यावर साधारण ४ ते ५ मिनीटे वाफ येईपर्यंत झाकण ठेवावे. पोहे जास्त कोरडे वाटत असतील तर वरुन थोडे पाणी शिंपडू शकता. 

९. वाफ आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि पोहे डीशमध्ये घेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा, डाळींबाचे दाणे, कोथिंबीर आणि शेव घालून खायला घ्यावे. 

 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.