जेवणानंतर आपल्यापैकी बऱ्याचजणांना काहीतरी गोड खाण्याची सवय असते. यासाठीच जेवल्यावर आपण चॉकलेट, गोड बडीशेप यांसारखे अनेक गोड पदार्थ खातो. जेवणानंतर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास खाण्याची पद्धत आहे. या मुखवासचे अनेक प्रकार असतात. यात बडीशेप, धनाडाल, टूटीफ्रूटी, आवळा कँडी, जिरागोळी असे अनेक प्रकारचे मुखवास अगदी आवडीने खाल्ले जातात. जेवणाचे चांगले पचन व्हावे, म्हणून मुखवास खाणे योग्यच आहे. पण मुखवास म्हणून रोज एकच पदार्थ खाण्यापेक्षा आपण नागवेलीच्या (विड्याची पानं) पानांचा वापर करुन झटपट तयार होणारा आणि दीर्घकाळ टिकणारा इन्स्टंट मुखवास घरच्या घरीच तयार करु शकतो(Pan Mukhwas Recipe).
एरवी जेवण झाल्यानंतर मुखवास म्हणून तोंडात टाकायला काही ना काही तरी लागतंच. कुणी बडीशेप खातं तर कुणाला लवंग, वेलची किंवा मसाला सुपारी खाण्याची सवय असते. एवढेच नव्हे तर काहीजण गोड मुखवास म्हणून गोड पान देखील खातात. याच पानांपासून घरगुती मुखवास कसा तयार करायचा याची सोपी रेसिपी पाहूयात. या पानांचा मुखवास तयार करण्यासाठी फारसे साहित्य लागत नाही, घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात हा पटकन तयार करता येतो. घरगुती मुखवास तयार करण्याची ही रेसिपी(How To Make Instant Paan Mukhwas At Home).
साहित्य :-
१. नागवेलीची पान - २० ते २५ (विड्याची पानं)२. बडीशेप - १/२ कप ३. धनाडाळ - १/४ कप ४. रंगीत गोड बडीशेप - १/४ कप ५. टूटीफ्रूटी - १/४ कप ६. गोड चेरी - १/४ कप ७. गोड सुपारी - २ टेबलस्पून ८. डेसिकेटेड कोकोनट - १/४ कप ९. गुलकंद - १/४ कप १०. कथ्या - १ टेबलस्पून (पाण्यांत भिजवलेला)११. क्रिस्टल मेंथॉल - चिमूटभर
कृती :-
१. सगळ्यात आधी खायची पानं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. धुतलेली ही पानं कापडाने पुसून वाळवून घ्यावीत. मग सुरीने या पानांचे देट कापून घ्यावेत. पानांच्या मागील बाजूस बरोबर मध्यभागी असणारी शीर देखील कापून घ्यावी. २. आता ही पानं एकावर एक अशी ठेवून एकत्रित उभी कापून त्याच्या लांब पट्ट्या तयार कराव्यात. आता या लांब पट्ट्या आडव्या कापत यांचे लहान लहान तुकडे करुन घ्यावेत. ३. आता एक सुती कापड घेऊन त्या कापडावर ही कापून घेतलेली पानं पसरवून उन्हात १ दिवस ठेवून व्यवस्थित वाळवून घ्यावीत.
भाऊबीजेला आणलेल्या रसमलईचा रस उरला? फेकून न देता करा झटपट होणारे ३ सोपे पदार्थ, चवीला उत्तम!
४. त्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये, हलकेच कोरडी भाजून घेतलेली बडीशेप, धनाडाळ, रंगीत गोड बडीशेप, टूटीफ्रूटी, चेरीचे लहान लहान तुकडे घ्यावेत. ५. आता यात बारीक किसून घेतलेली सुपारी, डेसिकेटेड कोकोनट, गुलकंद घालावे. त्यानंतर कथ्या घेऊन तो बारीक कुटून त्यात चमचाभर पाणी घालून चिमूटभर कथ्या घालावा. क्रिस्टल मेंथॉलची पावडर करून ती चिमूटभर यात घालावी. ६. सगळ्यात शेवटी यात वाळवून घेतलेली खायची पानं घालावीत. आता सगळे जिन्नस चमच्याने हलवून एकजीव करुन घ्यावे.
खायच्या पानांचा घरगुती मुखवास खाण्यासाठी तयार आहे. हे मुखवास एका हवाबंद काचेच्या बरणीत स्टोअर करुन ठेवावा. हा मुखवास आपण फ्रिजमध्ये ४ ते ५ महिन्यांसाठी स्टोअर करुन ठेवू शकता.