उन्हाळा ऋतू हा कैरी प्रेमींसाठी अतिशय आवडता ऋतू असतो. उन्हाळ्यांत येणाऱ्या कच्च्या कैऱ्या व आंबे खाण्याची मजा काही औरच असते. झाडावरची कैरी पाडून मग तिचे लांब काप करुन त्यावर लाल तिखट व मीठ भुरभुरवून खाण्याचा आनंद आपण सगळ्यांनीच अनुभवला असेल. उन्हाळयात येणाऱ्या कैरीचे अनेक पदार्थ घरोघरी केले जातात. कैरीचे लोणचे, पन्हं, साठवणीची मसाला कैरी, फोडणीची कैरी, कैरी भात कैरीचे असे अनेक पदार्थ बनवून काही पदार्थ खाल्ले जातात तर काही पदार्थ साठवून वर्षभर त्यांचा आस्वाद घेतला जातो.
जेवणासोबत तोंडी लावायला म्हणून आपण कैरीचे लोणचे, आंबा डाळ असे अनेक पदार्थ ताटात वाढून घेतो. या आंबट - गोड चवीच्या हिरव्यागार कैरीच्या पदार्थांमुळे जेवणाची रंगत वाढते. कैरीचा केला जाणारा छुंदा, मेथांबा, साखरांबा, गुळांबा, कैरीचं वर्षभर टिकणारं लोणचं असे प्रकार आपण आतापर्यंत खाल्लेच असतील. आपण जेवणात झटपट तोंडी लावायला म्हणून आंबट - गोड चवीची चटकदार कैरीची चटणी सुद्धा घरच्या घरी करु शकतो. झटपट बनवता येणारी आंबट - गोड, चटकदार कैरीची चटणी कशी बनवायची ते पाहूयात(How To Make Instant Raw Mango Chutney At Home).
साहित्य :-
१. कच्ची कैरी - १
२. कोथिंबीर - १ कप
३. ओलं खोबर - १ कप
४. लसूण पाकळ्या - ८ ते ९
५. पुदिना - १० ते १२ पाने
६. हिरव्या मिरच्या - ४ ते ५
७. मीठ - चवीनुसार
८. जिरे - १/२ टेबलस्पून
९. साखर - १/२ टेबलस्पून
१०. पाणी - गरजेनुसार
कच्च्या कैरीची घरीच पटकन बनवा आंबटगोड कॅण्डी, तोंडाला पाणीच सुटेल असा मस्त पदार्थ...
कृती :-
१. सर्वप्रथम एक कच्ची कैरी घेऊन ती स्वच्छ धुवून घ्यावी.
२. आता कैरीच्या वरील हिरवी साल काढून कैरी सोलून घ्यावी. सोललेल्या कच्च्या कैरीचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्यावे.
३. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात कच्च्या कैरीचे तुकडे, कोथिंबीर, ओलं खोबर, सोलून घेतलेल्या लसूण पाकळ्या, पुदिना, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, साखर, जिरे व गरजेनुसार पाणी घालून हे सगळे जिन्नस मिक्सरला जाडसर भरड होईपर्यंत वाटून घ्यावे.
४. मिक्सरमध्ये चटणी वाटून झाल्यानंतर चटणीची कंन्सिस्टंसी आपल्याला हवी त्याप्रमाणे त्यात थोडेसे पाणी ओतावे. त्यानंतर परत एकदा हलकेच मिक्सरमधून वाटून घ्यावे.
घरात कैरी असो नसो २ मिनिटांत बनवा थंडगार पन्हं ! पाहा ही जादू कशी करायची...
कच्च्या कैरीची आंबट - गोड चटपटीत चटणी खाण्यासाठी तयार आहे. या चटणीसोबत आपण डोसा, इडली, किंवा इतर तळणीचे पदार्थ खाऊ शकता. त्याचबरोबर जेवणात वरण - भातासोबत तोंडी लावायला म्हणून आपण ही चटणी सर्व्ह करु शकता.