ज्वारी. एकेकाळी गरीबाचं धान्य म्हणून हे धान्य मागे पडलं. ज्वारीची भाकरी खायला नाकं मुरडणारे अनेक होते. पण आता डायबिटिस, वजनवाढ, मिलेट्सप्रेम यासाऱ्याच नव्या चक्रात आता एकाएकी ज्वारीला ग्लॅमर आलं. अनेकांच्या आहारात कधी नव्हे ती ज्वारी आली. ज्वारीच्या भाकरी रोजच्या डब्यात येऊ लागल्या. ज्वारीचे फुलके कसे करायचे याचे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले. मुद्दा काय ज्वारीला ग्लॅमर आलं. टप्पोरी- पांढरी शुभ्र मोत्यासारखी ज्वारी, पांढऱ्या शुभ्र भाकरी, ठेचा, पिठलं, सोबत एखादी पातळ भाजी म्हणजे जेवण बेस्ट. पण हे सारं साग्रसंगीत करायला वेळच नसेल आणि तरी आहारात ज्वारी ठेवायची तर रात्री वनडिश मिलसारखे खायचे आणि भाकऱ्याही भाजायला नको असा विचार केला तर अनेक पर्याय आहेत. त्यातही करायला अगदी सोपी म्हणजे ज्वारीच्या पिठाची उकड आणि आंबील.आणि अजून मस्त पोटभरीचा चविष्ट पदार्थ म्हणजे ज्वारीची खिचडी. अगदी रोजच्या आहारातही ज्वारीची ही खिचडी खाता येते. भाज्या बदलल्या, डाळी बदलल्या की तिचा फ्लेवर बदलला.
(Image : google)
कशी करायची ज्वारीची खिचडी?
एक वाटी ज्वारी. सहा सात तास भिजवून घ्यायची. ते ही शक्य नसेल तर ज्वारीचा रवा मिळतो हल्ली, तो आणून भाजून ठेवा. तांदूळ/मुगडाळ हवे असल्यास. थोडेसे. इथं तुम्ही आवडीची कोणतीही डाळ घालू शकता.वाटीभर कुठलेही मोड आलेले कडधान्य. कोणतेही जे आवडेल ते. उपलब्धतेनुसार बदलता येतेच.भाज्या. गाजर /कोबी/ फ्लॉवर /मटार/ मेथी/ पालक/ फरसबी / ज्या आवडतील त्या भाज्या.जे आवडेल ते घ्या. प्रमाण असे काही नाही. कांदा छोटा चिरून, टमाटे, आलं लसूण, कोथिंबीर, कांदा लसून खात नसाल तर फक्त नारळ, कोथिंबीर, आले पेस्ट करा.कढीपत्ता, हळद, तिखट, मीठ आणि जो हवा तो मसाला/धने जिरे पूड/गोडा मसाला काहीही.
(Image : google)
कृती
कुकरमध्येच ही खिचडी करणं योग्य. तूप तापवून जिरे हिंग घालून कांदा टोमॅटो मऊ करून घ्यावा. त्यावर भाज्या, कडधान्य घालावी. भिजवून निथळवलेली ज्वारी घालावी. आले लसूण,हळद,मसाला आणि दोन वाट्या गरम पाणी घाला. शिट्ट्या चांगल्या चार करा. मग मंद गॅसवर पाच मिनिटं अजून शिूज द्या. ज्वारी मऊ शिजलेली हवी तर पाणी वाढवा आणि दहा मिनिटं मंद गॅसवर शिजवा.पोटभर, प्रोटीन मिलेट्स फूल, पचायला सोपी, करायला झटपट अशी ज्वारी खिचडी तयार.या खिचडीवर मस्त तूप घालून खा. तूप आवश्यकच.