इडलीचं पीठ तर काय आता बाजारातही आयतं मिळतं. आणलं पीठ केल्या इडल्या इतकं सोपं. मात्र त्या पिठात नेमकी कोणती धान्यं वापरतात हे आपल्याला अनेकदा माहिती नसतं. दुसरं म्हणजे सकाळी नाश्त्याला पौष्टिक हवं, मिलेट्स हवे, प्रोटीन हवं असेही आता अनेकांचे आग्रह असतात आणि ते योग्यही आहेच. पण सकाळी कोणताही पदार्थ करायचा म्हणजे पोटभरीचा, वेळखाऊ नसलेला आणि हेल्दी हे गणितही जमायला हवं. ते जमलं तर मग तो पदार्थ नाश्ता म्हणून हिट होतं. यासगळ्या अटीशथी लागू करुन पाहिलं तर एक सोपा आणि पौष्टिक पदार्थ करता येईल. ज्वारी आणि नागलीची इडली.
तुमच्याकडे धान्य नसेल आणि केवळ पीठं असतील तरीही या इडल्या करता येतील.
अर्थात थोडं आदल्या रात्री नियोजन हवं. ते जमलं तर या अगदी हलक्या मऊसूत झटपट इडल्या दिवसाची उत्तम सुरुवात करतील.
(Image : Yum curry.)
कशी करायची ज्वारी-नागली इडली?
साहित्य
नाचणी +ज्वारी अर्धी वाटी. धान्ये घेवून ५/६ तास वेगवेगळी भिजवा. वाटून घ्या.
उडीद डाळ १ वाटी ५तास भिजवून वाटा. त्यात थोडे मेथी दाणे घाला.
हे सगळे एकत्र करुन मीठ-साखर घालून रात्रभर आंबवायला ठेवावे.
धान्य नसतील तर अर्धी वाटी दोन्ही पिठं घेऊन, उडीद डाळ वाटून किंवा तिचेही वाटीभर पीठ घालून एकत्र आंबवले तरी चालेल. मात्र अशावेळी त्याच चमचाभर इडली रवा भिजवणे उत्तम.
दुसऱ्या दिवशी पीठ चांगले फुगले नाही तर त्यात किंचित खायचा सोडा किंवा इनो घालून चांगले फेटावे.
रात्रीही पीठ चांगली फेटून ठेवले तरी इडल्या हलक्या होतात.
आता सकाळी या पीठाच्या इडल्या कराव्या.
(Image : google)
भाजी इडली
याच पीठात पनीरचे तुकडे, ढोबळी मिरची, कोबी, गाजर, कोथिंबीर, आलेलसूणमिरची हे सगळे किंवा यापैकी काही जे असेल ते घालून भाजी इडलीही करता येेते.
याच पिठाचे डोसेही करता येतील.
सोबत हिरवी चटणी, सांबार. उत्तम. नसेल तर केवळ इडली चटणीही छान लागते.