Join us  

कच्छी दाबेली मसाला घरच्याघरी कसा बनवाल? परफेक्ट मसाला बनवण्याची रेसिपी, करा चविष्ट दाबेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2023 11:13 AM

How To Make Kachhi Dabeli Masala At Home : Recipe : चटकदार दाबेली मसाला वापरून आपण ठेल्यासारखी दाबेली घरी झटपट तयार करु शकतो.

कच्छी दाबेली स्ट्रीट फूडमध्ये मिळणाऱ्या पदार्थांपैकी एक लोकप्रिय पदार्थ आहे. कच्छी दाबेली म्हटलं की आपल्या सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत. काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली की आपण हमखास या कच्छी दाबेलीचा आस्वाद घेतो. पावाला गोड, आंबट, तिखट चटणी लावून मग त्यात मसालेदार बटाट्याचे सारण भरले जाते. त्यावरून बारीक चिरलेला कांदा, शेव, तिखट मसालेदार शेंगदाणे भुरभुरवले जातात. मग या तयार झालेल्या दाबेलीला मस्त भरपूर बटर लावून तव्यावर भाजून दिले जाते. अशी ही मसालेदार, तोंडाला पाणी आणणारी चटकदार दाबेली आपण रस्त्यांवरील ठेल्यांवर आवडीने खातो. परंतु ही एक दाबेली खाऊन पोट भरत असले तरीही मन भरत नाही. अशावेळी झटपट तयार होणारी दाबेली आपण घरी देखील बनवू शकतो.

दाबेलीची लज्जत आणि चव वाढविण्यासाठी त्यात एक प्रकारचा सिक्रेट मसाला घातला जातो. हा मसाला वापरुन दाबेलीतील बटाट्याचे सारण अधिक मसालेदार आणि चमचमीत होते. दाबेलीला विशिष्ट्य चव येण्यासाठी त्यात योग्य प्रमाणात मसाले घालणे गरजेचं आहे. सहसा घरी दाबेली बनवायची म्हटलं की आपण दाबेली मसाला बाजारातून विकत आणतो. परंतु हा दाबेली मसाला घरच्या घरी बनवणं आता सोपे झाले आहे. दाबेली मसाला बनविण्याचे साहित्य व कृती समजून घेऊयात. हा सिक्रेट दाबेली मसाला वापरून आपण ठेल्यासारखी दाबेली घरी झटपट तयार करु शकतो(How To Make Kachhi Dabeli Masala At Home : Recipe).     

साहित्य :- १. धणे - १/४ कप २. जिरे - १ टेबलस्पून ३. काळीमिरी - १ टेबलस्पून ४. बडीशेप - १ टेबलस्पून ५. लवंग - १ टेबलस्पून ६. मोठी वेलची - १७. दालचिनी - १८. बदामफुल - १९. तमालपत्र - १ १०. मीठ - चवीनुसार ११. पिठीसाखर - १ टेबलस्पून १२. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून १३. आमचूर पावडर - १ टेबलस्पून १४. सैंधव मीठ - १ टेबलस्पून १५. डेसिकेटेड कोकोनट - २ टेबलस्पून१६. तेल - २ टेबलस्पून १७. साखर - १ टेबलस्पून 

nutribit.app या इंस्टाग्राम पेजवरून घरच्या घरी झटपट दाबेली मसाला कसा तयार करायचा याचे साहित्य व कृती समजवून सांगण्यात आली आहे.  

कृती :- 

१. एका पॅनमध्ये धणे, जिरे, काळीमिरी, बडीशेप, लवंग, मोठी वेलची, दालचिनी, बदामफुल, तमालपत्र व चवीनुसार मीठ घेऊन कोरडे भाजून घ्यावे. 

२. कोरडे भाजून घेतल्यानंतर ते व्यवस्थित थंड होण्यासाठी एका मोठ्या डिशमध्ये काढून घ्यावेत. ३. आता हे सर्व भाजून घेतलेले जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन २ वेळा मिक्सरला फिरवून घ्यावेत. त्याची जाडसर पूड तयार करावी. ४. आता ही जाडसर पूड तयार झाल्यानंतर त्यात पिठीसाखर, लाल मिरची पावडर, आमचूर पावडर, सैंधव मीठ, डेसिकेटेड कोकोनट घालावे. त्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. 

५. आता हा मिक्सरमध्ये वाटून तयार झालेला मसाला एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावा. मग त्यात तेल आणि साखर घालून हा मसाला व्यवस्थित चमच्याच्या मदतीने एकजीव करून घ्यावा. ६. आता तयार झालेला दाबेली मसाला एका हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवावा. 

आपला दाबेली मसाला तयार आहे. हा दाबेली मसाला हवाबंद काचेच्या बरणीत भरून रेफ्रिजरेट करावा. दाबेली मसाला व्यवस्थित स्टोअर करून रेफ्रिजरेट केल्यास पुढील ३ ते ४ महिने चांगला टिकतो. घरच्या घरी दाबेली तयार करताना आपण हा दाबेली मसाला वापरु शकतो.

टॅग्स :अन्नपाककृती