Join us  

होळी स्पेशल : झणझणीत पारंपरिक कटाची आमटी तर होळीला खायलाच हवी! पाहा रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2023 2:43 PM

How To Make Katachi Amti : Recipe : कटाची आमटी आणि पूरणपोळी होळीचा फक्कड बेत जमायलाच हवा.

कटाच्या आमटीशिवाय पुरणपोळी अधुरीच आहे. पुरणपोळी खाताना कटाची आमटी तोंडी लावण्यासाठी म्हणून ही आमटी तयार केली जाते. कारण ज्या वेळेस आपण पुरणपोळीसाठी पुरणाची डाळ शिजवतो, त्यावेळेस त्यातील जे पाणी उरते. त्या पाण्यापासून कटाची आमटी तयार केली जाते. ही आमटी खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट लागते. कटाची आमटी बनवण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे. पुरणपोळी एखाद्या धार्मिक सणाला आपण बनवतो. त्यावेळेस देवाला नैवेद्य देखील पुरणपोळीचाच दाखवतो, त्यावेळेस कटाची आमटी देखील तयार केली जाते व देवाला नैवेद्य दाखवला जाते.

होळी आणि रंगपंचमीचा सण काही दिवसांवर आला असता प्रत्येक घरोघरी होळीची जोरदार तयारी सुरु असेलच. कटाची आमटी ही एक महाराष्ट्रीयन डिश आहे. जी पूर्वीपासून परंपरागत रीतीने चालत आली आहे. आपण ताकाची आमटी, आमसूलची आमटी, चिंचेची आमटी अशा अनेक आमटीचे प्रकार पाहिले आहेत परंतु कटाची आमटी ही पुरणाच्या उरलेल्या कटापासून तयार केली जाते व पुरणपोळी सोबत खाल्ली जाते. यंदाच्या होळीला पुरणपोळीसोबत कटाची आमटी नक्की ट्राय करुन पाहा(How To Make Katachi Amti : Recipe).  साहित्य :- 

१. कट - १ बाऊल  (पुरणपोळी बनविण्यासाठी चणा डाळ उकळवून त्याचे पाणी बाजूला काढून ठेवावे. त्याला 'कट' म्हणतात)२. तेल - ३ टेबलस्पून ३. कांदा - २ (उभा चिरून घेतलेला) ४. कोथिंबीर - १/३ टेबलस्पून ५. आले - २ इंचाचा तुकडा ६. लसूण - १० पाकळ्या ७. जिरे - १ टेबलस्पून ८. कढीपत्ता - ६ ते ८ पानं ९. हळद - १/२ टेबलस्पून १०. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून ११. गोडा मसाला - १ टेबलस्पून १२. मीठ - चवीनुसार १३. चिंचेचा कोळ - १ टेबलस्पून १४. चणाडाळ - १ टेबलस्पून (उकळवून मग मिक्सरला वाटून घेतलेली) १५. सुक खोबरं - २ टेबलस्पून (बारीक काप)  

कृती :- 

१. सर्वप्रथम एका पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात सुक्या खोबऱ्याचे बारीक काप, उभा चिरलेला कांदा, लसूण, आले प्रत्येकी वेगवेगळे भाजून घ्यावे. २. आता हे भाजून घेतलेले सर्व जिन्नस व कोथिंबीर एका मिक्सरच्या भांड्यात वाटून खोबऱ्याचे वाटप तयार करुन घ्यावे. ३. त्यानंतर एका मोठ्या भांड्यात तेल घेऊन त्यात जिरे, कढीपत्ता व खोबऱ्याचे तयार वाटप घालावे. 

४. या सगळ्या मिश्रणांत हळद, मीठ, लाल मिरची पावडर, गोडा मसाला घालून ४ ते ५ मिनिटे हे मिश्रण व्यवस्थित शिजू द्यावे. ५. त्यानंतर त्यात कट ओतावा, यांसोबतच चिंचेचा कोळ व उकळवून पेस्ट केलेली चणा डाळ घालावी. यामुळे कटाची आमटी मिळून येण्यास मदत होते. 

कटाची आमटी खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम कटाच्या आमटीवर कोथिंबीर भूरभुरवून ती पुरणपोळी किंवा भातासोबत खाण्यासाठी सर्व्ह करावी.

टॅग्स :पाककृतीअन्न