पूर्वी आसपासच्या गोठ्यातली गाय, म्हैस विणार आहे असं म्हटलं की, आपल्याला चिक मिळावा यासाठी लोकांची फार गडबड उडायची. मग सगळ्यांचे डोळे तिच्या बाळंतपणाकडे लागायचे. एकदा का गाय व्याली की मग मोजून मापून चिक घेऊन यायचा. घरातल्या ज्या बाईला उत्तम खरवस बनविता येतो ती चटकन पुढे येऊन खरवस बनवायला सुरुवात करायची. तो खरवस व्यवस्थितच झाला पाहिजे, कारण जर का त्यात काही बिघडलं तर परत पुढच्या वेळेची वाट पाहायला लागणार. परंतु आजकाल खरवस बाराही महिने मिठाईच्या दुकानात सहज मिळतो. खरवसाचे अनेक प्रकार आज बाजारात उपलब्ध आहेत. असे असले तरीही, डिशमधल्या चौकोनी तुकड्याची चमच्याने एक एक फोड पाडून खाण्यात जी मज्जा आहे ते फक्त खरवस खाणाऱ्यालाच माहित असते.
खरवस बनवायचा म्हटलं की त्यासाठी चिकाचे दूध मिळणे सर्वात महत्वाचे असते. हे चिकाचे दूध मिळत नाही तोपर्यंत आपल्याला खरवस खाण्याची वाट बघावी लागते. परंतु आता आपल्याला खरवस खाण्यासाठी अशी वाट बघावी लागणार नाही. कारण चिकाच्या दुधाशिवाय देखील आपण तितकाच सुंदर चवीचा खरवस घरच्या घरी बनवू शकतो. चिकाच्या दुधाशिवाय खरवस बनवण्याची सोपी झटपट कृती पाहूयात(How To Make Kharvas Without Chik Milk).
साहित्य :-
१. दूध - १ कप
२. मिल्क पावडर - १ कप
३. दही - १ कप
४. कंडेन्स मिल्क - १ कप
५. वेलची पूड - १ टेबलस्पून
६. अल्युमिनियम फॉईल - १ छोटा तुकडा
७. पाणी - गरजेनुसार
कृती :-
१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये दूध ओतून घ्यावे.
२. या दुधामध्ये एक कप मिल्क पावडर घालावी.
३. दुधामध्ये मिल्क पावडर घातल्यानंतर चमच्याच्या मदतीने ही दूध पावडर दुधामध्ये संपूर्णपणे विरघळवून घ्यावी.
४. दूध आणि मिल्क पावडर एकजीव झाल्यानंतर त्यात दही ओतावे. दही ओतल्यावर या मिश्रणात ते एकजीव होईपर्यंत ढवळून घ्यावे.
५. त्यानंतर या तयार झालेल्या मिश्रणात कंडेन्स मिल्क घालावे. हे सगळे मिश्रण आता एकजीव होईपर्यंत ढवळून घ्यावे.
आता घरीच करा जांभळाचे कुलर आणि गारेगार पॉपसिकल, रखरखीत दुपारी बच्चेकंपनीसाठी खास खाऊ...
६. आता हे मिश्रण एका वेगळ्या भांड्यात ओतून घ्यावे व त्यावरून वेलची पूड आपल्या आवडीनुसार भुरभुरवून घ्यावी.
७. हे सगळे मिश्रण भांड्यात सेट करून झाल्यावर त्यावर एक अल्युमिनियम फॉईलचा तुकडा लावून भांड्याचे तोंड संपूर्ण झाकून घ्यावे.
८. आता एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन हे खरवसाचे भांडे त्यात ठेवावे व वरून झाकण लावावे.
९. गॅसच्या मंद आचेवर हे भांडे ठेवून खरवस वाफेवर ४० मिनिटांसाठी शिजवून घ्यावा.
१०. खरवस संपूर्ण शिजवून झाल्यानंतर तो आतून नीट शिजला आहे की नाही हे तपासण्यासाठी एक टूथपिक घेऊन त्यात उभी रोवून बघावे. जर टुथपिकच्या काडीला खरवसाचे मिश्रण चिकटून आले तर तो नीट शिजला नाही असे समजावे.
११. खरवस वाफेवर शिजून तयार झाल्यावर तो थोडा गार होऊ द्यावा, गार झाल्यावर तो फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी १ ते २ तास ठेवून द्यावा.
दिवसभर मुलांचा दंगा, काहीतरी खायला दे अशी भूणभूण? करा चीज पराठा, सुटीचा स्पेशल बेत...
आपला बिना चिकाच्या दुधाचा खरवस खाण्यासाठी तयार आहे. या थंडगार खरवसाचे काप कापून तो खाण्यासाठी सर्व्ह करावा.