गणपतीसाठी वेगवेगळ्या खिरापती केल्या जात असल्या तरी पहिला मान असतो तो खोबऱ्याच्या खिरापतीला. सुक्या खोबऱ्याची खिरापत आणि पंचखाद्याची खिरापत ही प्रसाद म्हणून वाटण्यासाठी पहिले केली जाते. अनेक घरांमध्ये गणपती उत्सवाची तयारी म्हणून आधी खिरापत तयार केली जाते. सुक्या खोबऱ्याची खिरापत असू देत किंवा पंचखाद्य दोन्ही आरोग्यास फायदेशीर असतात. दोन्ही खिरापती तयार करायला (how to make khirapat and panchkhadya) अगदी सोप्या आहेत. गोव्यात पंचखाद्य खिरापत करताना ओलं खोबरं वापरलं जातं तर इतरत्र पंचखाद्य खिरापतीसाठी सुकं खोबरं वापरण्याची पध्दत आहे.
Image: Google
सुक्या खोबऱ्याची खिरापत
सुक्या खोबऱ्याची खिरापत करण्यासाठी 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी पिठीसाखर, 4 चमचे खसखस, चारोळी, थोडे काजूचे तुकडे आणि वेलची पूड घ्यावी. खिरापत करताना आधी खोबऱ्याची काळी पाठ काढून घ्यावी. खोबरं किसून घ्यावं. कढईत खोबऱ्याचा किस मंद आचेवर खरपूस लालसर भाजावा. नंतर कढईत खसखस गरम करुन घ्यावी. खोबऱ्याचा किस हातानं चुरावा. तो मिक्सरमध्ये वाटल्यास खिरापतीच्या कुरकुरीतपणाची मजा निघून जाते. खसखस एखादा चमचा साखर घालून वाटून घ्यावी. चुरलेल्या खोबऱ्याच्या किसात वाटलेली खसखस, पिठीसाख, काजूचे तुकडे, चारोळी आणि जायफळ वेलची पूड घालून खिरापत चांगली हलवून घ्यावी. ही खिरापत खोबरं छान खरपूस भाजलेलं असल्यास भरपूर दिवस टिकते.
Image: Google
पंचखाद्य खिरापत
पंचखाद्याची खिरापत करण्यासाठी पाऊन कप किसलेले सुके खोबरे, 1 चमचा खसखस, वाटीभर पत्री खडीसाखर, खारकांचे तुकडे किंवा खारीक पावडर आणि बदामाचे तुकडे घ्यावेत. पंचखाद्य खिरापत करताना खोबऱ्याची पाठ काढून खोबरं किसून घ्यावं. खारकेतल्या बिया काढून त्याचे बारीक तुकडे करावेत किंवा खारीक थोडी गरम करुन मिक्सरमधून वाटून घ्यावी. खोबरं कढईत मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावं. भाजलेलं खोबरं बाजूला काढून ठेवून त्याच कढईत् खसखस भाजून ती मिक्सरमधून वाटून घ्यावी. बदामाची पूड आणि खारकेची पूड थोडी गरम करावी. खडीसाखर ओबडधोबड वाटूअन् घ्यावी. भाजलेलं खोबरं हातानं चुरावं. त्यात खसखस, बदाम पूड/ तुकडे, खारीक पूड/तुकडे , खडीसाखर आणि वेलचीपूड घालून सर्व साहित्य एकत्र करावं. हे मिश्रण फक्त एकदाच मिक्सरमधून् फिरवावं किंवा मिक्सरमधून नाही फिरवलं तरी चालतं.
Image: Google
गोव्याची पंचखाद्य खिरापत
- गिरिजा मुरगोडी, गोवा
गोव्यात ओल्या खोबऱ्याची पंचखाद्य खिरापत गणपती बसण्याच्या आणि उठण्याच्या दिवशी केली जाते. ही पंचखाद्य खिरापत करण्यासाठी वाटीभर ताजं खोवलेलं खोबरं, खमंग भाजलेली थोडी मूगडाळ, काजूचे बारीक केलेले तुकडे, वेलची पावडर, मूठभर ज्वारीच्या लाह्या आणि अर्धी वाटी बारीक किसलेला गूळ ही सामग्री घ्यावी. ही खिरापत करताना खोबरं आधी खोवून घ्यावं. गूळ किसून घ्यावा. मूगडाळ खमंग भाजून घ्यावी. काजूचे बारीक तुकडे करावेत. कढईत खोवलेलं खोबरं आणि गूळ एकत्र करुन हे मिश्रण थोडं गरम करावं. गूळ विरघळला की गॅस बंद करावा. मिश्रण गार झालं की त्यात मूगडाळ, काजूचे तुकडे आणि लाह्या घालून खिरापत चांगली एकत्र करावी.