चमचमीत, झणझणीत कोल्हापुरी भडंग महाराष्ट्रांत फारच लोकप्रिय आहे. चहासोबत स्नॅक्स, प्रवासांत खाण्यासाठी, संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी असा जास्त काळ टिकणारा स्नॅक्स प्रकारांतील पदार्थ म्हणजे भडंग. भडंग हे जरी कोल्हापूरचे खास वैशिष्ट्य असले तरीही भारताच्या अनेक भागांमध्ये बनविले जाते आणि तितक्याच आवडीने खाल्ले जाते. संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी आपण चहासोबत फरसाण, चिवडा असे अनेक मसालेदार पदार्थ खातो.
गरमागरम चहासोबत, संध्याकाळच्या भुकेसाठी काहीतरी मसालेदार, झणझणीत खावंसं वाटलं तर भडंग हा एक उत्तम पर्याय आहे. सध्या बाजारांत भडंगचे अनेक फ्लेव्हर्स उपलब्ध असतात. चटपटीत चणाडाळीपासून ते लेमन भडंगपर्यंत असे विविध चवींचे भडंग आपण नक्कीच खाल्ले असतील. परंतु अस्सल कोल्हापुरी पारंपरिक भडंगची सर कशालाच नाही. अस्सल कोल्हापुरी चवीचे भडंग आपण घरी देखील बनवू शकतो. भडंग बनविण्यासाठीचे साहित्य व कृती पाहूयात(How To Make Kolhapuri Bhadang In Just 10 Min : Traditional Bhadang Recipe).
साहित्य :-
१. भडंग मसाला बनविण्यासाठीचे साहित्य :-
१. धणेपूड - १, १/२ टेबलस्पून
२. जिरेपूड - १ टेबलस्पून
३. बडीशेप पावडर - १ टेबलस्पून
४. आमचुर पावडर - १/२ टेबलस्पून
५. काळ मीठ - १/२ टेबलस्पून
६. चाटमसाला - १/२ टेबलस्पून
७. साखर - २ टेबलस्पून
८. लालतिखट - २ टेबलस्पून
९. हिंग - १/२ टेबलस्पून
१०. मीठ - १ टेबलस्पून
२. भडंग बनविण्यासाठीचे साहित्य :-
१. कुरमुरे - ४०० ग्रॅम
२. तेल - १ कप
३. शेंगदाणा - १ कप
४. मोहरी - १ टेबलस्पून
५. जिरे - १ टेबलस्पून
६. कढीपत्ता - ५ ते ६ काड्या
७. ठेचलेला लसूण - १/२ कप
८. चणा डाळ - १/२ कप
९. हळद - १ टेबलस्पून
१०. लाल तिखट मिरची पावडर - १ टेबलस्पून
कृती :-
भडंग मसाला बनविण्यासाठी :-
१. भडंग मसाला बनविण्यासाठी वरीलप्रमाणे दिलेले सर्व जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यात घालून. हे जिन्नस एकदा मिक्सरला फिरवून एकजीव करुन घ्यावेत. आपला भडंग मसाला तयार आहे.
भडंग बनविण्यासाठी :-
१. एका मोठ्या कढईमध्ये तेल घेऊन त्यात सर्वप्रथम शेंगदाणे हलकेच परतून घ्यावेत. त्यानंतर हे शेंगदाणे एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घ्यावेत.
२. आता त्याच तेलात मोहरी, जिरे, कढीपत्ता, ठेचलेला लसूण, चणाडाळ, लाल मिरची पावडर, हळद, भडंग मसाला घालून सर्व जिन्नस एकत्रित करुन छान मसाला फोडणी तयार करुन घ्यावी.
३. त्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये कुरमुरे घेऊन त्यांवर ही तयार करून घेतलेली मसाला फोडणी घालावी. त्यानंतर त्यात तळून घेतलेले शेंगदाणे व चवीनुसार मीठ व पिठीसाखर भुरभुरवून घ्यावी.
४. आता हे सगळे जिन्नस हातांच्या मदतीने किंवा चमच्याने एकजीव करून घ्यावेत.
भडंग खाण्यासाठी तयार आहे. तयार झालेले भडंग आपण हवाबंद डब्यांत स्टोअर करुन आपल्याला पाहिजे तेव्हा किंवा भूक लागल्यावर खाऊ शकता.